सांगलीत निकाल लागण्यापूर्वीच उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाची तयारी

By अविनाश कोळी | Published: June 3, 2024 08:16 PM2024-06-03T20:16:56+5:302024-06-03T20:17:13+5:30

सांगलीत उत्साह; पोस्टर, गुलाल, फटाक्यांपासून मिठाईची खरेदी

Candidates supporters prepare for victory even before the result in Sangli Lok Sabha Election | सांगलीत निकाल लागण्यापूर्वीच उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाची तयारी

सांगलीत निकाल लागण्यापूर्वीच उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाची तयारी

सांगली : लोकसभा निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला भाजपचे उमेदवार संजय पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून विजयोत्सव साजरा करण्याची पूर्वतयारी करण्यात आली. फटाके, गुलाल, पोस्टरपासून मिठाईच्या खरेदीपर्यंतची सर्व सज्जता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोणाच्या खरेदीवर पाणी पडणार व कोणाची तयारी फळाला येणार, हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.

दोन्ही उमेदवारांचे समर्थक, निकटवर्तीय, पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विजयाबद्दल कमालीची खात्री वाटत आहे. तज्ज्ञांसह विविध यंत्रणांचे अहवाल, अंदाज यांच्या आधारे विजयाची खात्री दोन्ही बाजूंनी व्यक्त होत आहे. काही अंदाज विशाल पाटील यांच्या बाजूने तर काही अंदाज संजय पाटील यांच्या बाजूने असल्यामुळे विजयोत्सवाची तयारी दोन्हीकडे सुरु झाली आहे.

ऐनवेळी धावाधाव नको म्हणून तजवीज

विजयाचा अंदाज आला रे आला फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्याचा बेत आखण्यात आला आहे. ऐनवेळी कार्यकर्त्यांची यासाठी धावाधाव नको म्हणून पूर्वखरेदी केली आहे.

खरेदी वाया जाण्याची भीती

विजयोत्सवातील साहित्य खरेदी करताना ती वाया जाण्याची भीतीही कार्यकर्त्यांच्या मनात आहे. निकाल काहीही लागू शकतो, असा व्यवहारी शहाणपणाही काहींनी व्यक्त केला आहे. दोन्हीपैकी एका बाजूच्या विजयोत्सवाच्या तयारीवर पाणी पडणार आहे. अशी वेळ आली तर साहित्य तसेच ठेवून विधानसभा निवडणुकीत किंवा उत्सव, समारंभात त्याचा वापर करण्याचा पर्यायही कार्यकर्त्यांनी शोधला आहे.

डिजिटल फलक काही मिनिटांत झळकणार

दोन्ही बाजूच्या उत्साही कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार विजयी होणार म्हणून डिजिटल फलकावरील डिझाईन तयार करुन ठेवली आहे. त्यावरील घोषवाक्येही तयार केली गेली आहेत. नेत्याच्या विजयाचा अंदाज आल्याबरोबर डिजिटलच्या प्रिंटची तात्काळ ऑर्डर देण्यात येणार आहे. सोशल मीडियावर झळकविण्यासाठीही पोस्ट तयार केल्या आहेत. त्याचा माराही मंगळवारी दिवसभर केला जाणार आहे.

Web Title: Candidates supporters prepare for victory even before the result in Sangli Lok Sabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.