Sangli Municipal Election 2026: सकाळी पदयात्रा, दुपारी बैठका आणि रात्री कोपरासभा; प्रचाराचे रान तापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:03 IST2026-01-06T17:02:18+5:302026-01-06T17:03:31+5:30
भाडोत्री प्रचारकांना भाव

Sangli Municipal Election 2026: सकाळी पदयात्रा, दुपारी बैठका आणि रात्री कोपरासभा; प्रचाराचे रान तापले
सांगली : महापालिका निवडणुकीचे रणमैदान तापू लागले असून प्रभागातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे. सकाळी पदयात्रेद्वारे घरोघरी संपर्क, दुपारी गल्ली निहाय बैठका आणि रात्री कोपरा सभा असे हाऊसफुल्ल वेळापत्रक तयार केले आहे.
प्रचारासाठी १२ दिवसांचा अवधी हाती असल्याने उमेदवारांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची तिकिटे लवकर निश्चित झाल्याने त्यांनी आपला प्रभाग पिंजून काढला आहे. तिकिटासाठी रस्सीखेच झालेल्या ठिकाणी मात्र उमेदवारांना मतदारापर्यंत पोहोचण्यात धावपळ करावी लागत असल्याचे दिसत आहे. यंदा प्रभाग रचनेत फारसा बदल झालेला नाही. मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये जोडून असणाऱ्या प्रभागात मात्र बदल झाले आहेत. त्यामुळे तेथील नव्या मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका मांडण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. विस्तारित भागातील प्रभागांमध्ये चारही उमेदवारांनी प्रचाराचे स्वतंत्र नियोजन केले आहे. थोड्या-थोड्या वस्त्या वाटून घेतल्या आहेत.
सकाळी नऊ-दहा वाजता पदयात्रेसाठी बाहेर पडल्यानंतर घरी परतण्यास एक-दोन वाजून जातात. त्यानंतर काही ठिकाणी गठ्ठा मतदानाच्या बैठका होतात. दुपारनंतर पुन्हा पदयात्रा आणि रात्री मुख्य चौकात कोपरासभा घेतल्या जात आहेत. पदयात्रेमध्ये अग्रभागी हलगीवाले आणि उमेदवारांची छबी झळकविणारे डिजिटल पोस्टर्स घेतलेले कार्यकर्ते असे पदयात्रेचे सर्रास दिसणारे चित्र आहे.
भाडोत्री प्रचारकांना भाव
सांगली-मिरजेतील काही चौकात आजूबाजूच्या गावांतून दररोज सकाळी रोजगारासाठी मोठ्या संख्येने कामगार वर्ग डबे घेऊनच येतो. चौकात थांबून रोजगाराची प्रतीक्षा करतो. काम मिळाले, तर सायंकाळी पगार घेऊनच घरी परततो. या मजूरवर्गाला निवडणुकीत रोजगार मिळाला असून त्यांना सध्या भावही चांगला आहे. पदयात्रांमध्ये असे भाडोत्री मजुरांचे चेहरे अनेक ठिकाणी दिसत आहेत.
विस्तारित भागातील प्रचार डोकेदुखी
सांगली, मिरज व कुपवाड शहरांच्या विस्तारित भागातील प्रचार म्हणजे उमेदवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. बहुतांश मतदार दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असल्याने घरांना कुलुपे असतात. तुरळक वस्ती असल्याने तेथे कोपरासभा ही घेता येत नाहीत. अनेक प्रभागांत शेत वस्त्यांचा समावेश आहे. तेथील मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांना घाम फुटत आहे.
कृष्णाघाटवाले म्हणतात,‘आम्हाला ग्रामपंचायत द्या’
मिरजेतील कृष्णाघाटचे रहिवासी विकासकामे होत नसल्याने वैतागले आहेत. ‘आम्हाला महापालिका किंवा नगरपालिका नको, स्वतंत्र ग्रामपंचायतच द्या’ अशी मागणी केली आहे. त्यासाठी तीन दिवसांपूर्वी रहिवाशांनी व्यापक बैठकही घेतली. येथील रहिवासी आक्रमक झाल्याने उमेदवारांना मते मागण्यासाठी जाणे आव्हान ठरले आहे.