Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये सेनापतींना बगल; सैन्यासाठी पायघड्या; भाजपची भूमिका चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:44 IST2025-07-02T18:43:53+5:302025-07-02T18:44:20+5:30

संजयकाकांना पुन्हा भाजपच्या परतीचे वेध लागले होते. मात्र..

BJP's role is under discussion after it sidelined former MP Sanjaykaka Patil and allowed his supporters to join the party in Tasgaon Kavathemahankal constituency | Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये सेनापतींना बगल; सैन्यासाठी पायघड्या; भाजपची भूमिका चर्चेत

Sangli Politics: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये सेनापतींना बगल; सैन्यासाठी पायघड्या; भाजपची भूमिका चर्चेत

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनंतर माजी खासदार संजयकाका गट संभ्रमावस्थेत आहे. मात्र भाजपमध्ये परतीसाठी इच्छुक असणाऱ्या संजयकाकांचे पुनर्वसन राष्ट्रवादीने करावे, असे सांगणाऱ्या भाजपने संजयकाकांच्या शिलेदारांसाठी मात्र पायघड्या घातल्या आहेत. त्यामुळे संजयकाका गटाच्या बाबतीत भाजपची भूमिका सेनापतींना बगल आणि सैन्याला पायघड्या अशीच दिसून येत आहे. त्यामुळेच भाजपची भूमिका चर्चेत आली आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत मोठा फेरबदल झाला. भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभा निवडणूक लढवली. त्याचवेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी देखील राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला निकालानंतर संजयकाकांना पुन्हा भाजपच्या परतीचे वेध लागले होते.

मात्र, संजय पाटील यांच्याशी अंतर्गत हाडवैर असणाऱ्या भाजप नेत्यांनी काकांनी पुन्हा भाजपमध्ये येऊ नये, यासाठी फिल्डिंग लावली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय पाटील यांचे पुनर्वसन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच राष्ट्रवादीमध्ये करावे. त्यासाठी आम्ही सहकार्य करू, असे सांगून संजय पाटील यांच्या परतीचे दोर कापले असल्याचे संकेत दिले होते.

एकीकडे संजय पाटील यांना रेड सिग्नल दाखवला असताना दुसरीकडे भाजपने संजय पाटील यांच्या शिलेदारांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीत देखील काका गटातील समर्थकांना वगळण्यात आले होते. आता कवठेमहांकाळ नगरपंचायत येथील काका समर्थक नगराध्यक्षांसह तीन नगरसेवकांना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची उपस्थिती बोलकी ठरली.

त्यामुळे महायुतीच्या झेंड्याखाली एकत्रित असणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील यानिमित्ताने फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळालेच, किंबहुना संजय पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या एकमेव सत्तास्थानाला देखील भाजपनेच सुरुंग लावल्यामुळे सद्यस्थितीत संभ्रमावस्थेत असणाऱ्या माजी खासदार संजय पाटील यांची राजकीय वाटचाल कशी असणार? हे पाहणे अवस्थेचे ठरणार आहे.

प्रभाकर पाटलांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह? 

एकीकडे संजय पाटील राष्ट्रवादीत असताना दुसरीकडे त्यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष असल्याचे दाखवून देत आहेत. भाजपने प्रभाकर पाटील यांना वगळून त्यांच्याच समर्थक नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला आहे. त्यामुळे आता प्रभाकर पाटील यांची भूमिका काय असणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: BJP's role is under discussion after it sidelined former MP Sanjaykaka Patil and allowed his supporters to join the party in Tasgaon Kavathemahankal constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.