नाईकांपाठोपाठ महाडिक बंधूही आता शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:43 IST2022-03-04T17:42:22+5:302022-03-04T17:43:17+5:30
भाजपमधील दिग्गज नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे.

नाईकांपाठोपाठ महाडिक बंधूही आता शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत
अशोक पाटील
इस्लामपूर : शिराळा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीत प्रवेश करताना शक्तिप्रदर्शन करणार आहेत, तर दुसरीकडे भाजपचेच नेते राहुल आणि सम्राट हे महाडिक बंधूही आता शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहेत. पेठनाका येथे व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या आवारात दिवंगत नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्याचे अनावरण एप्रिलमध्ये होणार आहे. यावेळी भाजपमधील दिग्गज नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात भाजपच्या शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख या दोघांनी एकत्रित मोट बांधली होती. परंतु सम्राट महाडिक यांनी सवतासुभा करून बंडखोरी केली. त्यामुळे राष्ट्रवादीला यश मिळाले. त्यानंतर महाडिक बंधूंच्या भाजपमधील प्रवेशाने राष्ट्रवादीविरोधात तीन गट एकवटले. आता त्यातील शिवाजीराव नाईक गट राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.
सध्या भाजपमध्ये सत्यजित देशमुख आणि महाडिक गट एकत्रित आहेत. परंतु आगामी काळात ते एकत्रित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाडिक बंधूंनी शिराळा मतदारसंघात सहकारी संस्था उभ्या करण्यावर भर दिला आहे. त्यांचा सहकारी दूध संघ नुकताच कार्यरत झाला आहे. आगामी काळात आणखी काही सहकारी संस्था नोंदणीकृत करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांचे वडील दिवंगत नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्याचे अनावरण पेठनाका येथे व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या आवारात एप्रिलमध्ये होणार आहे. यावेळी भाजपमधील दिग्गज नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे. त्यानिमित्ताने महाडिक बंधू शक्तिप्रदर्शन करणार आहेत.