सांगली महापालिका निवडणुकीत १५ प्रभागांत बिग फाईट; लक्षवेधी लढतीतील प्रभाग, उमेदवार.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:19 IST2026-01-13T17:18:32+5:302026-01-13T17:19:26+5:30
अनुभवी विरुद्ध नवखे, तर कुठे घराणेशाही विरुद्ध बदल अशी लढत

सांगली महापालिका निवडणुकीत १५ प्रभागांत बिग फाईट; लक्षवेधी लढतीतील प्रभाग, उमेदवार.. जाणून घ्या
सांगली : सांगली-मिरज–कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी तब्बल ३८१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. महापालिकेच्या २० प्रभागांपैकी तब्बल १५ प्रभागांमध्ये माजी नगरसेवक, स्थायी समितीचे माजी सभापती, तसेच माजी आमदारांचे नातेवाईक यांच्यात थेट लढती होत असल्याने या प्रभागांमध्ये बिग फाईट पहायला मिळत आहे.
महापालिकेची निवडणूक तिरंगी, चौरंगी होत आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), जनसुराज्य, शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने आघाडी केली आहे. निवडणुकीच्या मैदानात यंदा अपक्षासह राजकीय पक्षांचे ३८१ उमेदवार उतरले आहेत. सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.
उमेदवारी न मिळालेल्या अनेकांनी पक्षांतर करीत इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. अनुभवी विरुद्ध नवखे, तर कुठे घराणेशाही विरुद्ध बदल अशी लढत पाहायला मिळत आहे. काही प्रभागांमध्ये माजी पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी मिळते की नव्या चेहऱ्यांना मतदार पसंती देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच स्थानिक आघाड्यांनी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या प्रभागांमध्ये प्रचाराचा जोर अधिक असून, पदयात्रा, बैठका, संपर्क मोहीम वेगाने सुरू आहेत. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक ‘बिग फाईट’ ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
दिग्गज मैदानात
अनेक प्रभागांत माजी नगरसेवक आमने-सामने आले आहेत. तसेच माजी आमदारांची पत्नी, सून मैदानात उतरल्या आहेत. या प्रभागांमध्ये निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
नेत्यांचे नातलग रिंगणात
मिरजेत आमदार इद्रीस नायकवडी, माजी महापौर किशोर जामदार, दिवगंत हारुण शिकलगार, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश आवटी, दिलीप सूर्यवंशी, अजिंक्य पाटील, माजी आमदार नितीन शिंदे अशा दिग्गज नेत्यांचे नातलग निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. याशिवाय राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनाही उमेदवारी मिळाली आहे.
अशा आहेत लक्षवेधी लढती
प्रभाग - उमेदवार
- १ गट अ- रवींद्र सदामते (भाजप)- शेडजी मोहिते (राष्ट्रवादी शरद पवार)
- १ गट ड - चेतन सूर्यवंशी (भाजप)- विजय घाडगे (राष्ट्रवादी शरद पवार)
- २ गट ब - प्रकाश ढंग (भाजप)- गजनान मगदूम (राष्ट्रवादी अजित पवार)
- ३. गट ड - संदीप आवटी (भाजप)- दिगंबर जाधव (राष्ट्रवादी अजित पवार)
- ६. गट क- अल्लाबक्ष काझी (भाजप)- आझम काझी (राष्ट्रवादी अजित पवार)
- ६. गट ड - अल्लाबक्ष गाडेकरी (भाजप)- मैनुद्दीन बागवान (राष्ट्रवादी अजित पवार)
- ७. गट ब- दयानंद खोत (भाजप)- विशाल कलकुटगी (काँग्रेस)
- ९. गट ड - अतुल माने (भाजप)- मनगू सरगर (राष्ट्रवादी शरद पवार)
- १०. गट ब - प्रकाश मुळके (भाजप)- अनारकली कुरणे (राष्ट्रवादी शरद पवार)
- ११. गट ड - मनोज सरगर (भाजप)- हर्षवर्धन पाटील (काँग्रेस)
- १२. गट क- संजय यमगर (भाजप)- प्रमोद सूर्यवंशी (काँग्रेस)
- १२. गट ड- धीरज सूर्यवंशी (भाजप)- अभिजित फार्णे (राष्ट्रवादी शरद पवार)
- १३. गट क - मीनल पाटील (भाजप)- दीपाली पाटील (काँग्रेस)
- १४. गट ड - विजय साळुंखे (भाजप)- युवराज बावडेकर (शिंदेसेना)
- १६. गट ड - उत्तम साखळकर (भाजप)- मयूर पाटील (काँग्रेस)
- १८. गट क- वैशाली गवळी (भाजप) - स्नेहल सावंत (राष्ट्रवादी अजित पवार)
- १९. गट ड- संजय कुलकर्णी (भाजप)- युवराज गायकवाड (राष्ट्रवादी शरद पवार)
- २०. गट क- योगेंद्र थोरात (भाजप)-अतहर नायकवडी (राष्ट्रवादी अजित पवार)