Municipal Election: सांगली महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल ७०८ हरकती दाखल, ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:05 IST2025-11-27T18:04:51+5:302025-11-27T18:05:38+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियमानुसार प्राप्त होणाऱ्या हरकतींचीच दखल घेऊन पडताळणी केली जाणार

Municipal Election: सांगली महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल ७०८ हरकती दाखल, ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सांगली : महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका प्रभागातील मतदारांची दुसऱ्या प्रभागात समावेश करण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांनी संताप व्यक्त केला. दरम्यान प्रारूप मतदार यादीवरील हरकतींचा पाऊस पडला असून बुधवारअखेर ७०८ हरकती दाखल झाल्या आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने हरकती व सूचना दखल करण्याची मुदत २७ नोव्हेंबरवरून ३ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे हरकतीच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.
महापालिकेच्या प्रारुप मतदार यादीत अनेक त्रुटी समोर येत आहेत. एका प्रभागातील मतदारांची दुसऱ्याच प्रभागात समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील तक्रारी मोठ्या संख्येने येत आहेत. आजअखेर ५७४ हरकती दाखल झाल्या आहेत. इच्छुक उमेदवारांना मतदारांची नावे सापडत नसल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. हक्काच्या मतदारांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यामुळे हरकतींचा पाऊस पडत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियमानुसार प्राप्त होणाऱ्या हरकतींचीच दखल घेऊन पडताळणी केली जाणार आहे. स्थळपाहणी करून तपासणी केली जाणार आहे व आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत.
हरकती दाखल करण्याची मुदत उद्या, गुरुवार दि.२७ पर्यंत होती; पण सायंकाळी निवडणूक आयोगाने ही मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढविली. त्यामुळे हरकतींची संख्या वाढणार आहे. अंतिम मतदार यादी १० डिसेंबरला, मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी १५ डिसेंबर तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
एकगठ्ठा हरकतींचा आग्रह
मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी नमुना अ हा केवळ मतदारांनी सादर करावयाचा आहे. काही राजकीय कार्यकर्ते एकगठ्ठा पद्धतीने नमुना अ मध्ये मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करीत आहेत. अशा प्रकारे सादर केलेल्या हरकतींचा कोणताही विचार केला जाणार नाही, असे आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले, तसेच एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावे समाविष्ट असतील तर त्या हरकतींवर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग समितीनिहाय हरकती
- प्रभाग समिती १ - ५४
- प्रभाग समिती २ - ३६
- प्रभाग समिती ३ - २११
- प्रभाग समिती ४ - ४०७
सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे
- प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना : ३ डिसेंबर
- अंतिम मतदार यादी : १० डिसेंबर
- मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी - १५ डिसेंबर
- मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्धी - २२ डिसेंबर