सर्वोत्तम पोलीस ठाण्यात सांगली जिल्ह्यातील 'हे' पोलीस ठाणे राज्यात पहिले तर देशात सातवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 17:23 IST2021-11-20T16:47:36+5:302021-11-20T17:23:54+5:30
केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत सर्वोत्तम पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी आणि श्रेणी देण्यासाठी व मूल्यांकन करण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण करते. या निवडक दहा पोलीस ठाण्यांची नावे वार्षिक परिषदे दरम्यान जाहीर केली जातात

सर्वोत्तम पोलीस ठाण्यात सांगली जिल्ह्यातील 'हे' पोलीस ठाणे राज्यात पहिले तर देशात सातवे
शिराळा : शिराळा पोलीस ठाण्याने देशातील सर्वोत्तम सातवा क्रमांक तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. यामुळे शिराळा शहराचे नाव देशभर प्रसिद्धीस आले आहे. पोलीस ठाण्यात जाताना भीतीने दबकत जाणारा नागरिक परिसराचा झालेल्या कायापालटमुळे आणि मिळणाऱ्या वागणुकीमुळे समाधान व्यक्त करत आहे. या संदर्भातील प्रमाणपत्र राज्य, केंद्रशासित प्रदेशातील दहा पोलीस ठाण्यांना देखील प्रदान केले जाणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत सर्वोत्तम पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी आणि श्रेणी देण्यासाठी व मूल्यांकन करण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण करते. या निवडक दहा पोलीस ठाण्यांची नावे वार्षिक परिषदे दरम्यान जाहीर केली जातात. यासाठी सल्लागार फर्म म्हणून मेसर्स ट्रान्स रूरल अॅग्री कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रा. लि.ला गृहमंत्रालयाने देशातील सर्वोत्तम पोलीस ठाणे ओळखण्यासाठी सर्वेक्षणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी दिली होती . या टीमने शिराळा पोलीस ठाण्याला भेट दिली होती .
यासाठी देशातील ७५ पोलीस ठाण्याचे सर्वेक्षण करून १० पोलीस ठाण्यांची निवड झाली होती. आज याबाबत अंतिम निर्णय होऊन शिराळा पोलीस ठाणे देशामध्ये सातवा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. विभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर तसेच येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाने पोलीस ठाण्याचा कायापालट केला आहे.
पोलीस ठाण्याची इमारत, परिसर, याठिकाणी केलेली वृक्ष लागवड,विद्युत रोषणाई, स्वच्छता, सुविधा, गुन्हे, रेकॉर्ड, गुन्हे तपास, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांशी सवांद, गुन्हे निर्गती प्रमाण, सिसिटीव्ही, फलक अद्यावत आदी गोष्टी ची तपासणी व पाहणी केली आहे. हा पूर्ण परिसराचा कायापालट करण्यात आला आहे.येणाऱ्या नागरिकांना समाधान वाटावे असे वातावरण निर्माण झाले आहे.
अशी आहेत भारतातील दहा सर्वोत्तम पोलिस ठाणे
१) सदर बझार दिल्ली
२) गंगापूर ओरिसा
३) भट्टू कलान हरियाणा
४) वालपोई , गोवा
५) मानवी कर्नाटक
६) कडमट आयलंड लक्षद्वीप
७) शिराळा , महाराष्ट्र
८) थोटीय्याम , तामिळनाडू
९) बसंतगर , जम्मू काश्मीर
१०) रामपूर चौराम , बिहार