Sangli Municipal Election 2026: पक्ष नाही, चिन्हच ओळख, अपक्षांमुळे प्रचारात रंगत; उरले सात दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:24 IST2026-01-07T18:23:59+5:302026-01-07T18:24:18+5:30
मतदारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान

Sangli Municipal Election 2026: पक्ष नाही, चिन्हच ओळख, अपक्षांमुळे प्रचारात रंगत; उरले सात दिवस
सांगली : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचाराला वेग आला आहे. विशेषतः अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या अनोख्या चिन्हांनी यंदाच्या निवडणुकीत वेगळीच रंगत आणली आहे. कपबशी, नारळ, बॅट, शिटी, गॅस सिलिंडर आदी चिन्हे अपक्षांच्या वाट्याला आली आहेत. अपक्ष उमेदवारांकडून या चिन्हांना सामाजिक आणि स्थानिक प्रश्नांची जोड देत प्रचार केला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिकेच्या निवडणूक रिंगणात ३८२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात राजकीय पक्षासोबतच अपक्षांनी मैदानात उडी घेतली आहे. काही प्रभागात राजकीय पक्षांच्या नाराज कार्यकर्ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. या अपक्षांना नारळ, कपबशी, फुगा, बॅट, नगारा, शिटी, गॅस सिलिंडर, एअर कंडिशनर, चावी, सफरचंद, मेणबत्ती, टेबलसारखी चिन्हे देण्यात आली आहे. तरीही अपक्षांचा उत्साह कमी झालेला नाही. महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराला केवळ अकरा दिवसाचा कालावधी मिळाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारपर्यंत चिन्ह पोहोचविण्यासाठी अपक्ष उमेदवारांनी कंबर कसली आहे.
वाचा : नाराज इच्छुकांची मनधरणी करताना उमेदवारांची दमछाक
या चिन्हांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत आपली ओळख पोहोचवण्यासाठी अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ‘कपबशी’ आणि ‘नारळ’सारखी घरगुती ओळखीची चिन्हे सहज लक्षात राहणारी असल्याने प्रचारात त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. तर ‘बॅट’ आणि ‘शिटी’सारखी चिन्हे तरुण मतदारांना आकर्षित करत आहेत. ‘गॅस सिलिंडर’ आणि ‘एअर कंडिशनर’ ही चिन्हे मात्र महागाई, सार्वजनिक वाहतूक आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांशी जोडून प्रचारात वापरली जात आहेत.
वाचा : उद्धवसेना उमेदवाराच्या आईकडून विषारी द्रव्य प्राशन, अर्ज माघारीसाठी दबावचा आरोप
मतपत्रिकेवर पक्षाचे नाव नसल्याने चिन्ह हाच अपक्ष उमेदवारांचा खरा आधार ठरत आहे. त्यामुळे मतदारांच्या लक्षात राहील अशा पद्धतीने चिन्हांची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचार फेऱ्या, भित्तीपत्रके आणि सोशल मीडियावरही चिन्हकेंद्रित प्रचार सुरू आहे. अपक्ष उमेदवारांच्या या वेगळ्या चिन्हांमुळे महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे.
प्रचाराचे उरले सात दिवस
राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीची घोषणा होताच प्रचाराला सुरूवात केली होती. घरोघरी इच्छुक उमेदवारांनी पत्रके वाटली होती. त्यात पक्षासह केलेल्या कामाची माहिती देण्यात आली होती. पण अपक्षांना मात्र ही संधी मिळाली नाही. पक्षाकडून उमेदवारी नाकारलेले, नाराज कार्यकर्त्यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यांना प्रचारासाठी अकरा दिवस मिळविले. आता तर केवळ सातच दिवस उरले आहेत. या कमी कालावधीत अपक्षांना त्यांचे चिन्ह मतदारापर्यंत पोहोचविण्याचे खरे आव्हान आहे.