Sangli: तब्बल २३ वर्षांनंतर शिराळ्यात नागपंचमीला जिवंत नागांचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:38 IST2025-07-30T16:35:48+5:302025-07-30T16:38:40+5:30
ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर लक्ष

Sangli: तब्बल २३ वर्षांनंतर शिराळ्यात नागपंचमीला जिवंत नागांचे दर्शन
शिराळा : तब्बल २३ वर्षांनंतर शिराळा येथील ऐतिहासिक नागपंचमी उत्सवात मंगळवारी जिवंत नागांचे दर्शन भाविकांना झाले. मानाची पालखी, महिलांचे नागराज मंडळ, जिवंत नागदेवतेचे दर्शन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सर्पाबद्दल जनजागृती, अशा अनेक गोष्टींचे दर्शन यावेळी येथे घडले.
उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २००२ पासून प्रतीकात्मक नाग मूर्तीची मिरवणूक काढून नागपंचमी साजरी केली जाते. मात्र, यावर्षी जिवंत नागदेवतेचे दर्शन होत असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. अंबामाता मंदिरात देवीचे दर्शन आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
पावसाची पर्वा न करता गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत पारंपरिक पद्धतीने पूजा, पालखी पूजा तसेच घरातील महिलांनी नाग मूर्तीची पूजा करून यावर्षी नागपंचमी उत्सव साजरा केला. पावसात तरुणाई संगीताच्या तालावर नाचत होती आणि जिवंत नागांचे दर्शन झाल्याने भाविकांच्या मनात उत्साह वाढला होता.
नाग मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी नागाच्या प्रतिमेचे पूजन करून अंबा मातेचे दर्शन घेतले. मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होती. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान मानाच्या पालखीचे पूजन प्रमोद महाजन, रामचंद्र महाजन यांच्या घरी झाले, त्यानंतर ही पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी निघाली.
यावेळी आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, यशवंत उद्योग समूहाचे अध्यक्ष रणधीर नाईक, भाजप नेते सम्राट महाडिक, केदार नलावडे, पृथ्वीसिंह नाईक, देवेंद्र पाटील, रणजीतसिंह नाईक आदींनी पालखीचे पूजन केले.
सर्पदंशाची लसही उपलब्ध
आरोग्य विभागाकडून शिराळ्यात आवश्यक औषधांचा साठा तसेच सर्पदंशाची लस उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच पंधरा रुग्णवाहिका कार्यरत होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण नागपंचमी उत्सवावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवले जात होते. शिराळकरांनी स्वतःवर अनेक बंधने घालून या नागपंचमी उत्सवाचा अभिमानाने आणि संयमाने उत्सव साजरा केला.
ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर लक्ष
- केदार नलावडे यांच्या कच्च्याड मंडळा मार्फत नाथपंथी आघोरी डान्स आकर्षण ठरले.
- मुख्य मार्गावर तसेच अंबामाता मंदिर अश्या २१ ठिकाणी नाग पकडण्यास परवानगी मिळालेले ग्रामस्थ निसर्गचक्रातील नागांचे महत्त्व,शिक्षण व समाज प्रबोधन करत नागरिकांना माहिती करुन देत होते. यामध्ये सर्व ग्रामस्थ महिला सहकार्य करीत होते.यावर्षी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
- ड्रोन द्वारे शिराळा शहर तसेच तडवळे , उपवळे , मोरणा धरण , ओझर्डे , कुरळप, मांगले, सुरुल या संवेदनशील गावावर लक्ष ठेवण्यात आले होते.