निवडणुकीच्या रिंगणात पक्षांतराचे वर्तुळ झाले पूर्ण; उमेदवारांनी रात्रीत निष्ठा अन् पक्ष बदलल्याने कार्यकर्ते गोंधळात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:14 IST2026-01-10T17:13:18+5:302026-01-10T17:14:20+5:30
कालपर्यंत कौतुक आज शिव्या

निवडणुकीच्या रिंगणात पक्षांतराचे वर्तुळ झाले पूर्ण; उमेदवारांनी रात्रीत निष्ठा अन् पक्ष बदलल्याने कार्यकर्ते गोंधळात
सांगली : महापालिका निवडणूक लढण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली होती. उमेदवारी मिळण्यापूर्वी अनेकांनी निष्ठेचे पोवाडे गायले. परंतु उमेदवारी न मिळाल्याने काहींनी रात्रीत पक्ष आणि निष्ठा बदलली. उमेदवारीसाठी जाताना एका पक्षाचा झेंडा अन् दुसऱ्याचा पक्षाचा झेंडा हातात दिसल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले. ज्या पक्षात सत्तेची खात्री तिथेच अनेकांनी उमेदवारीचा हट्ट धरला. परंतु हा हट्ट पुरविला न गेल्याने निष्ठावान म्हणून डांगोरा पिटणारे पक्षातून अखेर ‘निसटले’. या निवडणुकीत काही उमेदवारांनी पक्षांतरांचे ‘वर्तुळ’ पूर्ण केले. त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची फरफटही पाहायला मिळाली.
महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वीच अनेकांनी लढण्याची तयारी केली होती. अगोदरच कोणत्या पक्षातून उमेदवारी मागायची हे ‘फिक्स’ केले. त्यासाठी पक्ष प्रवेश करून नेत्यांच्या मागे-पुढे फिरण्यास सुरुवात केली. कालपर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांवर आणि विचारधारेवर आगपाखड केली, त्याच पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन 'माझा पक्ष किती छान' याचे गोडवे काहींनी गायले. निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी स्वत:च्या ताकदीपेक्षा ज्या पक्षातून आपण निवडून येऊ शकतो, याचा अभ्यास केला. त्यानुसार सोयींनी प्रवेश केला. ज्यांच्या कारभारावर टीका केली, तेच अनेकांना चांगले वाटले. त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत उमेदवारीचा अट्टाहास केला.
या निवडणुकीच्या निमित्ताने काही उमेदवार, नेते मंडळींनी पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण केल्याचे दिसून आले. सुरुवातीला स्वार्थासाठी बाहेर पडले. तिथेही तिकीट न मिळाल्याने तिसऱ्या दारी गेले. शेवटी 'घरवापसी'चे गोंडस नाव देऊन काही जुन्याच पक्षात परतले. खऱ्या अर्थाने 'राजकीय रिसायकलिंग' काही ठिकाणी पाहायला मिळाले.
वाचा: महापालिका पटावर नवी सोंगटी, बाप माणसांची राजकीय कसोटी; सांगलीत 'या' नेत्यांची मुले, पुतणे, सुना निवडणूक रिंगणात
राजकारणात सतत पक्षांतर करणाऱ्या 'आयाराम-गयाराम' यांच्या खेळात सर्वांत जास्त हाल बिचाऱ्या कार्यकर्त्यांचे होतात. आपण कालपर्यंत ज्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या नावाने घोषणा दिल्या, आज त्याच नेत्याच्या विरोधात गळा काढावा लागतो. काल ज्याच्याशी दुष्मनी घेतली, आज त्याच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करावा लागतोय. मतदारांची अवस्था तर त्याहून बिकट आहे. ज्या उमेदवाराला 'पार्टी' बघून मतदान करायचे ठरविले होते, तोच उमेदवार ऐनवेळी दुसऱ्याच पक्षात स्थलांतरित झालेला असतो.
कालपर्यंत कौतुक आज शिव्या
निवडणुकीपूर्वी अनेक उमेदवारांनी आपल्या दारात पक्षातील नेत्यांच्या सभा, बैठका घेऊन त्यांचे गुणगान गायले. परंतु उमेदवारी न मिळाल्याने काहींनी मग विरोधी पक्षात जाऊन त्यांच्या उमेदवाराच्या सभा आपल्या दारात लावल्या आहेत. तिकीट नाकारणाऱ्यांना शिव्या-शाप देण्याचा उद्योग सुरू केल्याचे अनेक प्रभागांत दिसून आले.
कार्यकर्त्यांची चांगलीच फरफट
यंदाची महापालिका निवडणूक ही 'विचारांची' नसून पक्षांतर, बंडखोरीची असल्याचे अनेक ठिकाणच्या घडामोडींवरून दिसून येत आहे. ‘निष्ठा’ की ‘निसटा’ याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. नैतिकता केवळ भाषणापुरती उरली आहे. उमेदवारांच्या पाठोपाठ कार्यकर्त्यांची फरफट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जनतेचे प्रश्न मात्र शून्यात
उमेदवार पक्ष बदलू शकतो, पण आपल्या भागातील समस्या आणि प्रश्न बदलण्यासाठी विचारपूर्वक मतदान करावे लागणार आहे. नेत्यांची पक्षांतराची 'वर्तुळे' पूर्ण होत असताना जनतेचे प्रश्न मात्र 'शून्यात'च असल्याचे अनेक प्रभागांत दिसून येत आहे.