पारंपरिक वाद्यांच्या निनादात सांगली संस्थानच्या गणरायाला शाही निरोप, भाविकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:12 IST2025-09-01T16:11:54+5:302025-09-01T16:12:17+5:30

पेढे, फुलांची उधळण; संस्थान गणपतीला १७२ वर्षांची परंपरा आहे.

A royal farewell to Ganesha of Sangli Sansthan amidst the sounds of traditional instruments, a large crowd of devotees | पारंपरिक वाद्यांच्या निनादात सांगली संस्थानच्या गणरायाला शाही निरोप, भाविकांची मोठी गर्दी

छाया-नंदकिशोर वाघमारे

सांगली : सांगली संस्थानच्या गणपतीचे रविवारी शाही मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले. हजारो सांगलीकरांनी पेढ्यांच्या उधळणीत बाप्पाला निरोप दिला. रथोत्सव पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविकांनी गर्दी केली होती. संस्थान गणपतीला १७२ वर्षांची परंपरा आहे.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात सांगलीकरांनी बाप्पाला निरोप दिला. रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या व रोशनाई केलेल्या रथातून विघ्नहर्त्याची विसर्जन मिरवणूक निघाली. तत्पूर्वी राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये निरोपाची आरती झाली. भूतपूर्व संस्थानिक विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मीराजे पटवर्धन, पोर्णिमाराजे पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन, गणपती पंचायतनचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत आरती झाली. रविवारी पाचव्या दिवशी रथोत्सवाने विसर्जन सोहळा रंगला.

ढोल-ताशांच्या गजरात शानदार शाही मिरवणूक निघाली. अग्रभागी असणाऱ्या ध्वजपथकाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. सजविलेल्या रथात विराजमान झालेल्या बाप्पांची मिरवणूक राजवाडा चौकात आल्यानंतर भाविकांनी फुलांचा आणि पेढ्यांचा वर्षाव केला. पटेल चौक, झाशी चौक गणपती मंदिर यामार्गे मिरवणूक पुढे सरकत राहिली.

गणपती मंदिरात आरती झाली. यावेळी भाविकांनी पुढच्या वर्षी लवकर या असा एकच गजर केला. त्यानंतर मिरवणूक कृष्णा नदीकाठी सरकारी घाटावर गेली. तेथे निरोपाच्या आरतीसह बाप्पांचे विसर्जन झाले. विसर्जन सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी नदीकाठी, तसेच आयर्विन पुलावर गर्दी केली होती.

आकर्षक रांगोळीने स्वागत

मिरवणुकीच्या अग्रभागी असणाऱ्या लेझीम आणि झांजपथकाने वातावरणात चांगलाच रंग भरला. मार्गावरील मंडळांनी संस्थान गणेशाचे स्वागत केले. पटेल चौक ते गणपती मंदिरादरम्यान आकर्षक रांगोळी काढली होती. मंदिरासमोरील रांगोळीने लक्ष वेधून घेतले.

Web Title: A royal farewell to Ganesha of Sangli Sansthan amidst the sounds of traditional instruments, a large crowd of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.