गरीब पैलवानाला निवडणुकीत उभे करून फसविले- संजय पाटील

By अविनाश कोळी | Published: May 15, 2024 08:29 PM2024-05-15T20:29:24+5:302024-05-15T20:29:30+5:30

आघाडीतल्या माजी मंत्र्यांकडून पाकिटाचा प्रचार

A poor wrestler was cheated by standing in the election - Sanjay Patil | गरीब पैलवानाला निवडणुकीत उभे करून फसविले- संजय पाटील

गरीब पैलवानाला निवडणुकीत उभे करून फसविले- संजय पाटील

सांगली: महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून एका गरीब पैलवानाला लोकसभा निवडणुकीत उभे केले. ऐनवेळी माजी मंत्री असलेल्या आघाडीच्याच एका आमदाराने पैलवानाऐवजी बंडखोर उमेदवाराचा छुपा प्रचार केला, असा आरोप भाजपचे खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

पाटील म्हणाले की, निवडणुकीत उमेदवाराला फसविण्याचा उद्योग जसा महाविकास आघाडीत झाला तसा तो भाजपमध्येही झाला. सांगली लोकसभा मतदारसंघात आमच्याच पक्षातील काही लोकांनी सोबत असल्याचे भासवून दगाफटका केला. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची कृती उजेडात आली आहे. पक्ष निश्चित त्यांच्यावर कारवाई करेल. मात्र, पक्षात ज्यांनी विश्वासघाताचे राजकारण केले त्यांच्याशी तशाच पद्धतीने वागण्याची माझी भूमिका राहणार आहे.

पक्षात काही लोकांनी विरोधात काम केल्यामुळे मताधिक्य घटणार, हे निश्चित आहे. पूर्वी अडीच लाखांच्या मताधिक्याचा दावा मी केला होता. आता लाखाचे मताधिक्य मिळेल, असे वाटते. तरीही विजयापासून मी दूर झालो नाही. प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांना सहानुभूती जरूर मिळाली; पण सहानुभूतीचे मतात कधी रूपांतर होत नसते, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले की, भाजपच्या माजी अध्यक्षांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्याची शहानिशा केली जात आहे. पक्षातील ज्या लोकांनी उमेदवाराच्या विरोधात काम केले असेल त्यांचा अहवाल प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात येईल. संबंधितांवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई होईल.

हिशेब व्याजासह चुकता करू
भाजपमधील काही नेत्यांनी जे राजकारण माझ्यासोबत केले तसेच राजकारण यापुढे माझ्याकडूनही होईल. त्यांचा हिशेब व्याजासह चुकता केला जाईल, असा इशारा संजय पाटील यांनी दिला.

‘माई का लाल’ पैदा झाला नाही
माझी राजकीय कारकिर्द संपुष्टात येईल, असा इशारा एका नेत्याने दिला होता; पण, माझी कारकिर्द संपविणारा ‘माई का लाल’ अद्याप पैदा झाला नाही. त्यामुळे नथीतून तीर मारणाऱ्या नेत्याने हे लक्षात ठेवावे. त्यांना निकालादिवशी योग्य उत्तर मिळेल.

अश्लील छायाचित्राबद्दल तक्रार करावी

विरोधी उमेदवाराची आणखी छायाचित्रे आमच्याकडे होती. आमच्या लोकांनी छायाचित्रे व्हायरल केली म्हणून त्यांनी जरूर तक्रार करावी. त्यांनी निवडणुकीत बरेच रंग दाखविले आहेत. त्याचा फायदा त्यांना झाला नाही, असे संजय पाटील म्हणाले.

रोख जयंतरावांकडे की विश्वजित कदम यांच्याकडे?
चंद्रहार पाटील यांना फसविल्याची टीका करताना संजय पाटील यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. रोख जयंत पाटील यांच्याकडे आहे की, विश्वजित कदम यांच्याकडे याचेही उत्तर त्यांनी दिले नाही.

कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा

लोकसभेच्या राजकारणाविषयी संजय पाटील म्हणाले की, कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू केव्हाही चांगला. ज्यांनी ज्या पद्धतीने माझ्याशी राजकारण केले त्यांच्याशी तसेच राजकारण केले जाईल.

Web Title: A poor wrestler was cheated by standing in the election - Sanjay Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.