सांगली महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास झुंबड, २४५ जणांकडून अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:38 IST2025-12-30T15:37:45+5:302025-12-30T15:38:47+5:30
आज शेवटचा दिवस : निवडणूक यंत्रणा सतर्क, सहाही निवडणूक कार्यालयात गर्दी

सांगली महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास झुंबड, २४५ जणांकडून अर्ज दाखल
सांगली : महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. सोमवारीवारी २० प्रभागांमधून २४५ अर्ज दाखल झाले. गेल्या दोन दिवसांत २७० जणांनी अर्ज भरले आहेत. त्यात माजी उपमहापौरांसह गटनेते, आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सहाही कार्यालयांत उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दिवसभर या कार्यालयांमध्ये इच्छुक व त्यांच्या कार्यकर्त्यांचा राबता राहिला.
महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वच विभागीय कार्यालयात सकाळपासून गर्दी होती. भाजपने संभाव्य उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची सूचना केली होती. पण पक्षाचे एबी फाॅर्म मात्र मंगळवारी हाती दिले जाणार आहेत. त्यामुळे भाजपच्या संभाव्य उमेदवारांनी पक्षाकडून अर्ज दाखल केले. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, उद्धवसेना, शिंदेसेना व मनसेकडून काही अर्ज दाखल झाले. या पक्षांकडून अजून उमेदवारांच्या निश्चितीचा घोळ सुरूच आहे. रात्री उशिरा दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसची नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याने मंगळवारी अर्ज दाखल होतील, असे सांगण्यात आले. मिरजेत राष्ट्रवादी (अजित पवार) व भाजपच्या संभाव्य उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरले.
सांगलीतील प्रभाग समिती दोनमध्ये सर्वाधिक ६७ अर्ज दाखल झाले. माळबंगला कार्यालयाकडे ४०, तरुण भारत क्रीडांगण कार्यालयाकडे ३३, कुपवाड निवडणूक कार्यालयाकडे ५३, मिरजेतील प्रशासकीय इमारतीतील कार्यालयाकडे ४८, बालगंधर्व नाट्यगृह येथील कार्यालयाकडे २९ दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे.
सोमवारी ५६३ अर्जांची विक्री
उमेदवारी निश्चितीसाठी थांबलेल्या इच्छुकांनी सोमवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले. एकाच दिवसात ५६३ अर्जाची विक्री झाली. आतापर्यंत २५०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. यात सर्वाधिक ४६२ अर्जांची विक्री तरुण भारत क्रीडांगण कार्यालयातून झाली आहे. त्यानंतर सांगलीतील प्रभाग समिती दोनमध्ये ४३५, माळबंगला कार्यालयाकडे ४१२, कुपवाड निवडणूक कार्यालयाकडे ४१०, मिरजेतील प्रशासकीय इमारतीतील कार्यालयाकडे ४३४, बालगंधर्व नाट्यगृह येथील कार्यालयाकडे ३९५ अर्जाची विक्री झाली आहे.
माजी नगरसेवकांनी भरले अर्ज
माजी नगरसेवकांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात संतोष पाटील, रोहिणी पाटील, अतुल माने, जगन्नाथ ठोकळे, वर्षा निंबाळकर, विद्या कांबळे, प्रकाश मुळके, गीता पवार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, भाजपचे प्रकाश ढंग, मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, लक्ष्मी सरगर, धीरज सूर्यवंशी, संजय यमगर, मंगशे चव्हाण, फिरोज पठाण, पवित्रा केरीपाळे, उत्तम साखळकर, गीताजंली ढोपे पाटील, सविता मदने, युवराज गायकवाड, गजानन मगदूम, पद्मश्री पाटील, शेडजी मोहिते, सविता मोहिते यांच्यासह काही मातब्बरांनी अर्ज दाखल केले आहेत.
पोलिस बंदोबस्त वाढविला
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सत्यम गांधी यांनी यंत्रणेला सतर्क केले आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, सर्व निवडणूक कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही देखरेख ठेवण्यात आली आहे.