Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > #साधेसकस :आहारातून गहू-डाळी वगळल्या तर तब्येत सुधारते या दाव्यांवर विश्वास कसा ठेवता?

#साधेसकस :आहारातून गहू-डाळी वगळल्या तर तब्येत सुधारते या दाव्यांवर विश्वास कसा ठेवता?

आहारशास्त्र फार सखोल आहे. माणसाची शारिरीक आणि बौद्धिक क्षमता यांचा फार जवळचा संबंध त्याच्या आहाराशी आहे.चारीठाव जेवा असं म्हणण्यामागे हे पोषणसूत्र आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 03:30 PM2021-03-19T15:30:11+5:302021-03-19T16:09:26+5:30

आहारशास्त्र फार सखोल आहे. माणसाची शारिरीक आणि बौद्धिक क्षमता यांचा फार जवळचा संबंध त्याच्या आहाराशी आहे.चारीठाव जेवा असं म्हणण्यामागे हे पोषणसूत्र आहे.

#Sadheksakas: diet food- Malati karvarkar-ICMR balnace diet chart. | #साधेसकस :आहारातून गहू-डाळी वगळल्या तर तब्येत सुधारते या दाव्यांवर विश्वास कसा ठेवता?

#साधेसकस :आहारातून गहू-डाळी वगळल्या तर तब्येत सुधारते या दाव्यांवर विश्वास कसा ठेवता?

Highlightsतुमचे शरीर एक यंत्र आहे आणि त्या यंत्राच्या मशागतीसाठी लागणारी एखादी गोष्ट बंद करुन टाकलीत तर ते थोडे दिवस चालेल पण मग पुढे त्रास देईल.लेखातील छायाचित्रं- सौजन्य गुगल

भक्ती चपळगांवकर

मी फेसबुकवर मुंबई स्वयंपाकघर नावाचा एक ग्रुप सुरू केला आहे. विस्मृतीत गेलेले पदार्थ पुन्हा चर्चेत यावेत हा त्यामागचा उद्देश होता, पण या ग्रुपमध्ये इतक्या छान चर्चा सुरू झाल्या की आता आम्ही एकूण खाद्यसंस्कृतीबद्दल माहितीची देवाणघेवाण करतो. एकदा एकीने लिहिले, आहारातून डाळी आणि गहू वगळला आणि माझ्या तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर झाल्या. हा तिचा दावा फार धोकादायक होता. कारण आजकाल समाज माध्यमांवरचे लिखाण वाचून जीवनशैलीत बदल करणारे लोक कमी नाहीत. एखाद्या विशिष्ट आजारावर उपाय म्हणून जेवणातून एखादी गोष्ट वगळणे वेगळी गोष्ट आहे, पण रोजचा आहार संतुलित असणे अत्यावश्यक आहे. विशेषतः शहरी लोक ताण, प्रदुषण, भेसळयुक्त अन्नाचा मारा अशा गोष्टींचा रोज सामना करत असतात. त्यात तुम्ही आहारात टोकाचे बदल केले तर तब्येतीच्या नव्या तक्रारी सुरू होतील.

आहारसूत्र या मालिकेत मालती कारवारकर लिहितात - ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ही संघटना समतोल आहाराचे तक्ते ठरवते. सध्या या संस्थेने जो तक्ता प्रसिद्ध केला आहे किंवा ज्याची शिफारस केली आहे तो असा -
१. गहू , ज्वारी, तांदूळ, बाजरी - ३६१ ग्राम
२. डाळी, कडधान्ये - ४९ grams
३. पाले भाज्या, केशरी, लाल इ. - २१ grams
४. इतर भाज्या - ८९ grams
५. फळं - ६६ grams
६. दूध - २५० grams
७. मांस, मासे, अंडी - २२ grams
८. तेल, चरबी इत्यादी - ३५ grams
९. साखर, गूळ - ३५ grams
हे सर्व पदार्थ कामकाज करणाऱ्या तरुण स्त्री पुरुषांनी खावे असे आयसीएमआर सांगते, म्हणून आपण ऐकायचं. हा तक्ता तोंडपाठ करून टाका. मुलांनाही करायला लावा. यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की समतोल आहाराने आपल्याला खरं म्हणजे खूप पदार्थ खायला दिले आहेत. पण आपण जाणून बुजून हे पदार्थ उलटसुलट करून खातो. म्हणजे असं की नं १, ८, ९ या क्रमांकावर तक्त्यात जे पदार्थ आहेत ते हवे तेवढे भरपूर खातो. आवडतात म्हणून नं ७ चेही पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. त्यामानानं २ ते ६ मधले पदार्थ खाण्याची सवय लावून घ्यायची. कारण या पदार्थांशिवाय शरीराची बांधणी होणार नाही. हे एका माणसाचं रेशन आहे. ते जास्त वाटत असल्यास नं १ मधले पदार्थ कमी खावेत.

 

मालतीबाईंचा आहारशास्त्राबद्दलचा प्रत्येक शब्द प्रमाण मानला पाहिजे. त्यांनी वैद्यकशास्त्र आणि आहारशास्त्राची सांगड घालत महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. रोजच्या आहारातील काही गोष्टी साफ टाळा असे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा त्याचा संदर्भ फार मर्यादित असतो. आहारशास्त्र फार सखोल आहे. माणसाची शारिरीक आणि बौद्धिक क्षमता यांचा फार जवळचा संबंध त्याच्या आहाराशी आहे. या संबंधाना सिध्द आपण रोज करत असतो. मुलं नीट खात पीत असतील तर शाळेचा अभ्यास नीट करु शकतात, त्यांना नीट झोप लागते, ती आनंदी दिसतात. ती तशी असावी म्हणून आपण त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतो पण स्वतःबद्दल मात्र तसा विचार करत नाही. कित्येकदा डॉक्टरांच्या वार्षिक तपासणीत आपली जीवनसत्वे कमी झाल्याचे लक्षात येते आणि मग आपण आहाराकडे लक्ष द्यायचे ठरवतो. अर्थात काही दिवसांनी येरे माझ्या मागल्या होते आणि काही गोष्टी कमी तर काही जास्त असा आहार सुरू होतो.
संतुलित आहारासाठी आपल्या वाडवडलांनी एक छान शब्द वापरला. चारीठाव जेवण. जेवणात भात वरण भाजी पोळी चटणी दही असे सगळे पदार्थ असले की ते झाले चारीठाव जेवण. आज पोषणतज्ज्ञ म्हणतील जेवणात कर्बोदक, प्रथिने, जीवनसत्व, एन्झाईम्स, कोंडा, तेल सगळं हवे. म्हणजेच हे चारीठाव जेवण. हे खा खाल्ले तर आपल्याला ते लागू होते असे मला वाटते. आपल्या वाडवडलांनी जे खाल्ले ते आपल्याला पचते असे मला वाटते. माझ्या आजीआजोबांच्या ताटात वरण भाजी भाकरी ताक कधी भात पोळी आणि कधी कधी गोड पदार्थ होते. ते सगळे बहुतेकांना चालते. पण जेंव्हा आपण अति आंबट गोड तिखट खारट तेलकट खातो, त्यावेळी त्याचे परिणाम शरीरावर दिसतात. हे परिणाम कमी व्हावेत आणि आयुष्य सुदृढ व्हावे प्रयत्न असावा. पण चारीठाव जेवण म्हणजे भरपेट जेवण नाही. जे खातो ते प्रमाणात.
सगळे प्रमाणात खाल्ले तर हे पूर्णब्रम्ह जगण्यासाठी लागणारी सगळी उर्जा आपल्याला देते. वरण बंद करून, कडधान्ये बंद करून, गहू बंद करून, मांसाहार बंद करून , दूध दही बंद करून काही तरी कमतरता नक्की निर्माण होऊ शकते. आजकाल अनेक आहारपद्धती जेवणातली एखादी गोष्ट पूर्णपणे बंद करायला सांगतात, उदाहरणार्थ, कर्बोदक (पोळी, भात, बटाटा) किंवा दूधाचे पदार्थ. तुमचे शरीर एक यंत्र आहे आणि त्या यंत्राच्या मशागतीसाठी लागणारी एखादी गोष्ट बंद करुन टाकलीत तर ते थोडे दिवस चालेल पण मग पुढे त्रास देईल. अर्थात एखाद्या शारीरिक व्याधी मुळे एखादा पदार्थ वगळणे वेगळी गोष्ट आहे.

 

(लेखिका खाद्यसंस्कृती, कुटूंब, माध्यम संबंधी लिखाण करतात आणि फेसबुकवर लोकप्रिय असलेला ‘मुंबई स्वयंपाकघर’ हा ग्रुपही त्यांनी सुरु केलेला आहे. )
‘मुंबई स्वयंपाकघर’
https://www.facebook.com/groups/606730686147413/


 

Web Title: #Sadheksakas: diet food- Malati karvarkar-ICMR balnace diet chart.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.