lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वाट्टेल ते वाट्टेल तेव्हा खाणं मध्यमवयाच्या वाटेवर महागात पडतंय ! -हा तपासा तुमचा आहार

वाट्टेल ते वाट्टेल तेव्हा खाणं मध्यमवयाच्या वाटेवर महागात पडतंय ! -हा तपासा तुमचा आहार

मध्यमवयातला आहार अधिक जागरुकतेनं घ्यायला हवा, त्याकाळात संतुलीत आहार ठेवला नाही तर चुकीच्या जीवनशैलीने घेरणारे आजार मागे लागतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:10 PM2021-04-26T16:10:54+5:302021-04-26T17:15:17+5:30

मध्यमवयातला आहार अधिक जागरुकतेनं घ्यायला हवा, त्याकाळात संतुलीत आहार ठेवला नाही तर चुकीच्या जीवनशैलीने घेरणारे आजार मागे लागतात.

neglecting diet, no time for food, and lifestyle disease will trouble you more & early | वाट्टेल ते वाट्टेल तेव्हा खाणं मध्यमवयाच्या वाटेवर महागात पडतंय ! -हा तपासा तुमचा आहार

वाट्टेल ते वाट्टेल तेव्हा खाणं मध्यमवयाच्या वाटेवर महागात पडतंय ! -हा तपासा तुमचा आहार

Highlightsकमी वयात डायबेटीस, हृदय विकार किंवा रक्तात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढणं ,स्थूलता , कमी एनर्जी लेव्हल्स असे अनेक त्रास मागे लागू शकतात.

वैद्य राजश्री कुलकर्णी, (एम.डी. आयुर्वेद)

कोणतीही व्यक्ती मध्यम वयात येईपर्यंत नोकरीत आणि लग्न वगैरे करुन संसारात पण बऱ्यापैकी स्थिरावलेली असते. घरात एखाद दुसरं लहान मूल असतं, प्रौढ वयातील आई वडील असतात आणि ते स्वतः जोडपे असते.
या वयात दोन तीन गोष्टींची काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं ते म्हणजे दिनचर्या चांगली राखणं.विशेषतः ज्यांना कामाच्या निमित्ताने टूर असतात,देश विदेशात फिरावं लागतं, त्यांचं खाणं, पिणं, झोप या सगळ्यावर परिणाम होतो. तरुण वय असल्याने त्यावेळी त्या गोष्टींचं महत्त्व वाटत नाही व लक्षही दिलं जात नाही पण इथेच चूक होते व विविध आजारांची बीजे शरीरात रोवली जातात.
योग्य आहार,व्यायाम आणि झोप व इतर शारीरिक ऍक्टिव्हिटीज याचा बॅलन्स जो साधतो त्यांच्या आरोग्याचा पाया मजबूत राहतो नाहीतर मग कमी वयात डायबेटीस, हृदय विकार किंवा रक्तात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढणं ,स्थूलता , कमी एनर्जी लेव्हल्स असे अनेक त्रास मागे लागू शकतात. शरीराचे स्नायू ढिले होणं , तसेच हाडांची घनता कमी होणं हे याच वयोगटातील पण जरा उशिरा जाणवणारे त्रास आहेत. योग्य काळजी घेतल्यास हे सगळं टाळणं शक्य आहे.
कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम करणं अत्यावश्यक आहे. आपली एनर्जी, वय,लिंग,कामाचं स्वरूप, प्रकृती यानुसार जो आणि जितका झेपेल तितका व्यायाम करायलाच हवा. यात अगदी जॉगिंग पासून ते जिममध्ये केल्या जाणाऱ्या सर्व व्यायामाचा समावेश होतो.
झोप साधारण सहा ते सात तास पुरेशी आहे,त्यातही वेळेत झोपणं व उठणं हे महत्त्वाचं आहे.उशीरा झोपून उशीरा उठणं नको!


आता आहाराच्या महत्वाच्या विषयाकडे वळू. खाण्याचे चोचले कमी करायला हवेत. आपलं डाएट खरोखरीच बॅलन्स कसं होईल हे पहायला हवं.यासाठी काही टिप्स:
• बाहेरचं खाणं जितकं कमी करता येईल तितकं बरं कारण त्यामुळे आपोआपच अनहेल्दी गोष्टींपासून दूर राहता येईल.विशेषतः त्याच त्याच तेलात तळलेले पदार्थ, खूप स्पायसी पदार्थ, बेकरीचे पदार्थ कमी होतील .
• शरीराची चयापचय प्रक्रिया वयानुरूप बदलत असते त्यामुळे खूप कर्बोदके असणारा आहार घेऊ नये.थोडक्यात तांदूळ व गहू यांचं
प्रमाण जरा कमी करावं.
• ज्यांच्या घरी डायबिटीस असण्याचा आधीच्या पिढीचा इतिहास आहे त्यांनी विशेषतः हे जरुर पाळावे. वर्षभर साठवलेले जुने गहू, तांदूळ शक्यतो वापरावेत .ते शक्य नसेल तर निदान तांदूळ तरी भाजून वापरावेत.
• आहारात अधूनमधून ज्वारी,बाजरी ,नाचणी ,राजगिरा या धान्यांचा वापर करावा.
• धान्ये भाजून दळून त्या भाजणीच्या पिठाची भाज्या घालून थालिपीठं खावीत. ज्यांचा कोठा जड आहे किंवा ज्यांना मलावष्टंभ आहे त्यांनी मात्र थालिपीठं किंवा भाकरी खाताना लोणी/तूप यांचा वापर अवश्य करावा.
• नाश्ता किंवा जेवणात काहीतरी कच्चे खाण्यात येईल याची दक्षता घ्यावी म्हणजे फळ किंवा सॅलड, कोशिंबीर अशा स्वरूपात असावं.
• फळांचा रस करुन गाळून वगैरे पिऊ नये, त्यापेक्षा अख्खं फळ चावून खावं, चिकू, सफरचंद, पेअर अशा फळांच्या देखील साली काढून लोकं ती फळं खातात , वास्तविक हा सालांचा चोथा किंवा रफेज पोट साफ होण्यासाठी गरजेचा असतो ,त्यामुळे फळं तसंच काकडी,गाजर,बिट वगैरे भाज्या देखील सालीसकट खाण्यावर भर द्यावा.


• कच्च्या भाज्या, फळं खाण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीरात ऑक्सिजन फ्री रॅडीकल्स निर्माण व्हायला आळा बसतो कारण ताज्या भाज्या, फळं यामध्ये अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात ,डायबेटीस, हार्ट डिसीज यांना दूर ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, रक्तवाहिन्या ब्लॉक होणं , कोलेस्टेरॉल साठणं हे यामुळे टळू शकते.
• अधूनमधून एखादा दिवस फक्त द्रव आहार करावा, किंवा पूर्ण लंघन करावं जेणेकरून शरीरातील आम कमी होण्यास मदत होते.

• ज्यांना भूक सहन होते त्यांनी शक्यतो ब्रेकफास्ट करूच नये तर फक्त दोन वेळा जेवण करावं
• जेवण पूर्ण घ्यावं,वरणभात, भाजी पोळी,सॅलड, एखादी ओली अथवा कोरडी चटणी ,दुपारच्या जेवणात वाटीभर ताक असं चालेल.
• एखाद्या दिवशी नाश्ता करावासा वाटला तर जेवणाची मात्रा जरा कमी करावी .
• वजन,कोलेस्टेरॉल यांचा विचार या वयात अधिक सतावू लागल्यामुळे आहारात बहुतेक सर्व लोकं तूप,दूध ,लोणी यांना फाटा देतात परंतु शरीरातील सगळे अति महत्त्वाचे अवयव म्हणजे मेंदू, हृदय, फुफ्फुसे यांना काम करण्यासाठी उत्तम प्रतीच्या स्निग्ध पदार्थांची किंवा फॅट्सची गरज असते त्यामुळे योग्य प्रमाणात दूध,तूप ( अर्थातच चांगलं तूप, तेही गायीचं असेल तर उत्तम!),एखादा कप दूध पिणं आवश्यक आहे.
• दूध,तूप, क्वचित सुका मेवा हे घेत राहिल्यानं स्नायूंची ताकत, लवचिकपणा आणि हाडे मजबूत राहण्यास मदत होते व ऑस्टिओपोरोसिस वगैरे सारख्या तक्रारींपासून दूर राहता येते.
• बहुतेक जणांकडून होणारी मोठी चूक म्हणजे तूप,लोणी (घरगुती),दूध खायचं नाही पण बाहेरच्या अनेक पदार्थांमधून बटर तेही अतिरेकी खारवलेले, क्रीम,चीज,पनीर ,मेयोनीज,वनस्पती तूप यांचा मारा केलेले पदार्थ मात्र दणकून खायचे ,याचा काहीच उपयोग नाही.
• साखर व मैदा या पांढऱ्या शत्रूंपासून लांबच रहावं.
• जेवण व झोप यात कमीतकमी दोन तासांचं अंतर राहील असं पहावं.
अशा प्रकारचा आहार ठेवला तर पुढे प्रौढत्वाकडे झुकणाऱ्या वयात होणारे आजार आपण नक्की टाळू शकतो आणि प्रदीर्घ काळ तारुण्याचा आनंद लुटू शकतो हे नक्की !

(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आणि आयु:श्री या आयुर्वेद केंद्राच्या संचालक आहेत.)
rajashree.abhay@gmail.com
www.ayushree.com

Web Title: neglecting diet, no time for food, and lifestyle disease will trouble you more & early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.