उन्हाळा असो की पावसाळा असो... हल्ली आपल्या आजूबाजूला नेहमीच खूप डास दिसतात. सध्या तर सगळीकडे उकाडा आणि त्यात पुन्हा संध्याकाळनंतर होणारा डासांचा हमला.. या दोन्ही गोष्टी अगदी नकोशा होऊन जातात. डासांचा त्रास कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे केमिकल्स वापरतो. पण ते आरोग्यासाठी त्रासदायकच असतात. त्यामुळे त्यांचा कमीतकमी वापर करून जर पुढे सांगितलेले काही सोपे उपाय तुम्ही केले तर डास तुमच्या घरातून कायमचे पळून जातील. ते उपाय नेमके कोणते आणि कसे करायचे ते पाहुया..(4 Simple Remedies to Get Rid of Mosquitoes)
डासांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय
१. बाजारात शेणाच्या गोवऱ्या मिळतात. या गोवऱ्यांवर थोडेसे तूप आणि कापूर टाकून त्यांचा जर धूर केला आणि तो घरात सगळीकडे फिरवला तर डास येणं बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जातं.
नागपूरच्या लेकीची मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया स्पर्धेत चर्चा, पितळेच्या ताटात सजले मराठमोळे पदार्थ
२. एका पणतीमध्ये १ ते २ तेजपान घ्या. त्यामध्ये ५ ते ६ कापुराच्या वड्या टाका आणि ते जाळून त्याचा धूर घरात सगळीकडे पसरवा. तेजपान आणि कापुराच्या सुगंधामुळेही डास पळून जातात.
३. डासांना घालवण्यासाठी हल्ली बऱ्याच ठिकाणी मोहरीचे तेल आणि ओवा यांचा वापर केला जातो. यासाठी ओवा कुटून त्याची पावडर करून घ्या. त्यात थोडं मोहरीचं तेल घाला. आता हे मिश्रण कागदाच्या तुकड्यांवर घेऊन ते घरात ठिकठिकाणी ठेवून द्या. यामुळे डासांचे प्रमाण बरेच कमी होते. शिवाय हे तेल जर तुम्ही थोडेसे अंगाला लावले तर डास तुमच्याकडे फिरकतही नाहीत.
४. संध्याकाळी घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये कडुलिंबाचे तेल घालून दिवा लावा. यामुळेही घरातले डास कमी होण्यास मदत होते.
५. डासांना घरापासून दूर ठेवण्याचा आणखी एक उपाय म्हणजे घरातली अडगळ दूर करा. जर घरात खूप अडगळीचे सामान ठिकठिकाणी ठेवलेले असेल तर साहजिकच डासांचे प्रमाण वाढेल.
