lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > नात्यात संशय, घराला आग!- जोडीदाराचं अफेअरचं आहे, असा ‘संशय’ येतो तेव्हा काय कराल?

नात्यात संशय, घराला आग!- जोडीदाराचं अफेअरचं आहे, असा ‘संशय’ येतो तेव्हा काय कराल?

सतत संशय घेणं हा आजार असू शकतो, मात्र ते कुणी स्वीकारत नाही आणि मग आयुष्य राखरांगोळी होतं. अशावेळी काय उपाय करावेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 05:51 PM2021-09-18T17:51:51+5:302021-09-18T17:52:16+5:30

सतत संशय घेणं हा आजार असू शकतो, मात्र ते कुणी स्वीकारत नाही आणि मग आयुष्य राखरांगोळी होतं. अशावेळी काय उपाय करावेत?

Doubt in a relationship, how to overcome? is it a mental illness? | नात्यात संशय, घराला आग!- जोडीदाराचं अफेअरचं आहे, असा ‘संशय’ येतो तेव्हा काय कराल?

नात्यात संशय, घराला आग!- जोडीदाराचं अफेअरचं आहे, असा ‘संशय’ येतो तेव्हा काय कराल?

Highlightsकधी कधी संशयामुळे नातं इतकं विस्कटलेलं असतं की अनेक सुयोग्य पद्धतीचे प्रयत्न करूनही नात्यात ओलावा निर्माण होत नाही.

राजू इनामदार

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून,  संशयावरून नवऱ्याची बायकोला बेदम मारहाण, बायको सतत संशय घेते या त्रासाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या, सतत भांडणे आणि संशयाच्या कारणावरून देशात अनेक जोडपी घटस्फोटाच्या मार्गावर....
अशा बातम्या आपण वाचतो, पाहतो, ऐकतो. मन सून्न होतं. केवळ संशयाच्या कारणामुळे होणारी अनेक कुटुंबांची होरपळ पाहून खरोखर मनातून हादरून जायला होते. अत्यंत तरुण वयात आणि ऐन उमेदीच्या काळात संसाराला बसणारे झटके अनेकांची आयुष्य उध्वस्त करून टाकतात. अशा कुटुंबात जर छोटी मुले असतील तर घरातील सततच्या या हिंसेने अत्यंत भयभीत होतात. त्यांच्या आयुष्यावर दीर्घकालीन, कधीही भरून न येणारा दुष्परिणाम होत असतो. एकूणच सहजीवनातील आनंद, समाधान, सुख नाहीसे होऊन द्वेष, तिरस्कार, सूड, दुःख या चक्रात नातं फसतं आणि सहजीवनाच्या झाडाला विषारी फळे येऊ लागतात. संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले असे नातेसंबंध स्वतः संशय घेणाऱ्या व्यक्तीला आणि इतरांनाही धोक्याच्या परिघात ओढत असतात. संशयी मनामध्ये नात्याला जाळून टाकण्याची मोठी क्षमता असते आणि म्हणूनच आज आपण संशय या वर्तन समस्ये विषयी सविस्तर समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

संशय हे एक मानसिक आजाराचे लक्षण...


बाहेरून बिलकुल लक्षात न येणारा मात्र सगळा संसार उध्वस्त करण्याची क्षमता असणारा हा एक मानसिक आजार आहे याला विचारभ्रमाचा आजार असेही म्हणतात. या आजाराच्या रुग्णाचे ठराविक संशय, विचारभ्रम सोडता उरलेले इतर व्यक्तिमत्व अगदी सामान्य व्यक्तीसारखे असते. त्यामुळे हा आजार आहे यावर कोणाचा विश्वास बसत नाही आणि तो स्वीकारलाही जात नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती जेव्हा संशय घेते तेव्हा तो एक संशयाचा विचारभ्रम आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. हा विचारभ्रम हा एक अत्यंत भ्रामक विचार असतो यात व्यक्ती आपल्या मनाने आपल्या जोडीदाराला दुसऱ्या व्यक्तीसोबत जोडते आणि कितीही पुरावे दिले तरी संशय घेणाऱ्या व्यक्तीचा समज अगदी घट्ट झालेला असतो. त्यावरून ती व्यक्ती हटायला तयार नसते कारण असा विचारभ्रम बाळगणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने हा भ्रम पूर्ण खरा असतो आणि त्यामुळेच त्याच्या सर्व भावना आणि कृती या भ्रमाला अनुसरूनच होतात.

कारणं काय?

१. अनुवंशिकता - एखाद्या कुटुंबामध्ये जर संशयाच्या आजाराचा इतिहास असेल तर मागच्या पिढीतील हा आजार पुढच्या पिढीत येऊ शकतो आणि संबंधित व्यक्तीला त्रासदायक ठरू शकतो
२. व्यक्तिमत्त्वदोष - आत्मविश्वास कमी असणे ,
३. स्वप्रतिमा मलिन झालेली असणे , सतत असुरक्षित वाटणे, जोडीदारावर मालकी हक्काची भावना वाटणे, मनात गैरसमजाच्या भिंती उभ्या असणे, त्यातून लवकर संशय येतो.
४. लैंगिक समस्या - एखाद्या व्यक्तीला काही लैंगिक समस्या असेल तर त्याच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होऊन त्याचे पर्यवसान जोडीदाराच्या चारित्र्यावर संशय घेण्यामध्ये होऊ शकते.
५. वेगवेगळ्या मानसिक आजारांमध्ये देखील संशयाचे विचार भ्रम निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ - स्किझोफ्रेनिया तसेच तीव्र औदासीन्य.
६. व्यसने- दारू गांजा आणि इतर अमली पदार्थाच्या व्यसनाच्या आधीन गेलेल्या व्यक्तींमध्येही संशयाचा विचार भ्रम निर्माण होऊ शकतो.
७. ही एक मानसिक प्रकारची क्रूर हिंसा असते . ज्यामुळे जोडीदाराला सतत दडपणाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
८. अनेक वेळेला जोडीदारामध्ये आपसात सशक्त संवादाचा, मनमोकळ्या चर्चेचा अभाव असल्यामुळे एकमेकांविषयी अनेक गैरसमज मनात ठाण मांडून बसलेले असतात. या गैरसमजांचे निराकरण न करता पूर्वग्रहदूषित मनाने एकमेकांवर संशय घेणे चालू असते. प्रत्यक्षात काहीच प्रश्न नसताना केवळ गैरसमजातून नाते धोक्यात आलेले असते.

मानगुटीवर बसलेले हे संशयाचे भूत खाली उतरवायचे कसे?


१. मदत मागा, मदत घ्या.
आपल्या स्वतःला किंवा आपल्या जोडीदाराला संशयाने घेरले असेल आणि त्यामुळे एकूणच आपले सहजीवन धोक्यात आले असेल तर त्वरित या परिस्थितीचा स्वीकार करून, स्वतःचा
हेकेखोरपणा सोडून, सुयोग्य व्यक्तीकडे न संकोच करता मदत मागायला हवी. आपली परिस्थिती बघून कोणी संवेदनशील व्यक्ती आपल्याला मदत करू इच्छित असतील तर आदरपूर्वक अशी मदत स्वीकारायला हवी वेळीच मिळालेली मदत नात्याचा विध्वंस टाळू शकते.
२. समुपदेशन 
संशया सारख्या आजाराच्या विळख्यात सापडलेल्या दांपत्याला समुपदेशन हा एक अत्यंत शास्त्रीय उपाय आहे. तज्ज्ञ समुपदेशकाच्या सल्ला आणि मार्गदर्शनामुळे संशय या वर्तन समस्येची सखोल चिकित्सा केली जाते तसेच मनात ठाण मांडून बसलेले अविवेकी दृष्टिकोन बाजूला करून सुयोग्य विवेकी विचार करण्याची शिकवण दिली जाते त्यामुळे ही वर्तन समस्या सुटण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
३. औषधोपचार
मनोविकार तज्ज्ञांकडे विचार भ्रम कमी करणारी आता अत्यंत प्रभावी औषधे उपलब्ध असतात. फक्त व्यक्तीला संशयाचा आजार आहे हे पटवून देऊन आणि त्यासाठी औषधोपचारांची गरज आहे हे लक्षात घेऊन तज्ज्ञांचा सल्ला आणि औषधोपचार घ्यायला हवा. काही काळ सातत्याने घेतलेल्या औषधोपचारामुळे कोणतीही व्यक्ती सहीसलामत या संशयाच्या आजारातून बाहेर येऊ शकते.


४. नात्यातील सशक्त संवाद 
जोडीदारांनी आपसात सतत संवाद, चर्चा करणे आवश्यक आहे.  प्रेम आणि आपुलकीने एकमेकांना समजून घेणे. विश्वास पूर्ण नाते घडवण्यासाठी जाणीवपूर्वक एकमेकांची दखल घेऊन वेळ द्यायला हवा. अशा सशक्त नात्यांमध्ये संशयाचा विषाणू परतवण्याची मोठी धमक असते.


५. स्वतःला बदलण्याची तयारी.
आजूबाजूचे जग झपाट्याने बदलत आहे या बदलणाऱ्या जगाची मूल्यही बदलत आहेत. नेहमीच्या रूढ स्त्री-पुरुष नात्याच्या पलीकडे कामानिमित्त किंवा इतर काही कारणामुळे अनेक स्त्री-पुरुषांना एकमेकांबरोबर काम करावे लागते, वेळ घालवावा लागतो अशा वेळी ही परिस्थिती लक्षात घेऊन जोडीदारांनी एकमेकांना समजून घेत या परिस्थितीशी जुळवून घेणे शिकायला हवं. बदलत्या काळानुसार स्वतःला बदलायला हवं. विशाल मन करून एकमेकांना विकासाचा अवकाश द्यायला हवा नात्यांमध्ये स्वातंत्र्याचं , स्व अवकाशाचं मूल्य आपण जपायला हवं. 


६. समजूतदारपणे एकमेकांपासून वेगळे होणे.


कधी कधी संशयामुळे नातं इतकं विस्कटलेलं असतं की अनेक सुयोग्य पद्धतीचे प्रयत्न करूनही नात्यात ओलावा निर्माण होत नाही. एकमेकांविषयीचा तिरस्कार इतका बळावलेला असतो की कधी-कधी जीवही धोक्यात आलेला असतो. नातं महत्त्वाचं का जीव महत्त्वाचा असा प्रसंग ज्यावेळी उभा ठाकतो अशावेळी कायदेशीर पद्धतीने एकमेकांपासून वेगळं होणं हाही एक महत्त्वाचा पर्याय असू शकतो आणि दोघेही नव्याने आयुष्य सुरू करू शकतात.

(मानसरंग समन्वयक - मानस मित्र )
परिवर्तन संस्था.
मानसिक आधार आणि आत्महत्या प्रतिबंध मनोबल हेल्पलाइन ७४१२०४०३००
वेबसाईट-www.parivartantrust.in

 

Web Title: Doubt in a relationship, how to overcome? is it a mental illness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.