उन्हाळा म्हटलं की आंब्याचे पदार्थ हमखास आठवतात. त्यातच घरच्या घरी तयार करता येणारा मँगो बार हा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा प्रकार आहे. बाहेर मिळणाऱ्या मँगो आइस्क्रिमसारखीच चव घरीही मिळू शकते आणि त्यासाठी फार मेहनतही लागत नाही. (Mango popsicle: Make mango bars at home in minutes, creamy soft and melt-in-your-mouth recipe for kids )पिकलेल्या गोड आंब्यांचा गर वापरून तयार केलेला मँगो बार चवीला नैसर्गिक, फ्रेश आणि अधिक स्वादिष्ट लागतो. बाजारातील अनेक आइस्क्रिममध्ये कृत्रिम रंग, फ्लेवर किंवा जास्त साखर असू शकते, पण घरी बनवलेला मँगो बार आपल्या आवडीनुसार करता येतो. त्यामुळे तो अधिक हेल्दी पर्याय ठरू शकतो.
घरच्या मँगो बारचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात आंब्याची खरी चव आणि सुगंध टिकून राहतो. थंडगार, मऊसर आणि क्रीमी टेक्स्चरमुळे हा पदार्थ उन्हाळ्यात खास ठरतो. लहान मुलांना तर हा प्रकार खूप आवडतोच, पण पाहुण्यांसाठीही हा एक छान डेझर्ट पर्याय ठरू शकतो. एकदा नक्की करुन पाहा. फार वेळ लागत नाही. पटकन होतो.
साहित्य
आंबा, काजू, फ्रेश क्रिम, मिल्कमेड , बदाम
कृती
१. मस्त छान ताजा आंबा घ्या. आंबा सोलून त्याची सालं काढून टाका आणि आंब्याचा गर काढून घ्यायचा. एका मिक्सरच्या भांड्यात गर काढून घ्यायचा. त्यात भिजवलेले काजू घालायचे. जास्त नाही थोडेच घ्यायचे. काजू आणि आंब्याचा मिक्सरमध्ये फिरवून रस काढायचा.
२. फ्रेश क्रिम थोडे फेटून घ्यायचे. फेटून झाल्यावर त्यात आंब्याची आणि काजूची वाटलेली पेस्ट घालायची. फ्रेश क्रिम घालायचे. थोडं मिल्कमेड घालायचं. बदामाचे तुकडे घालायचे. सगळं एकजीव आणि मऊ होईपर्यंत फेटून घ्यायचं. फेटून झाल्यावर जरा घट्ट होतं. मग आईस्क्रिम मोल्डमध्ये रस ओतायचा. त्याला स्टिक्स लावायच्या आणि फ्रिझरला ठेवायचे. रात्रभर ठेवा म्हणजे मस्त घट्ट आईस्क्रिम तयार होते.
