उन्हाळ्याच्या दिवसांत गरमागरम ताकाची कढी सर्वचजण आवडीनं पितात. तर काहीजण भात किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत खातात. ताकाची कढी करणं खूप सोपं आहे (How To make Kadhi From Buttermilk). अनेकदा ताक खूपच आंबट असतं त्यामुळे कढीची चव बिघडते तर कधी कढीचा फ्लेवर बिघडतो. कधी जास्त घट्ट होते तर कधी खूप पातळ होते. परफेक्ट ताकाची कढी करणं ही सुद्धा एक कला आहे. परफेक्ट ताकाची करण्यासाठी काही टिप्स पाहूया. (Kadhi From Buttermilk Recipe)
१. बेसनाचे प्रमाण योग्य ठेवा
ताक आणि बेसनाचे प्रमाण योग्य असणे खूप गरजेचे आहे. बेसन कढीला दाटपणा तर देतेच, पण ताक फुटण्यापासूनही वाचवते. साधारणपणे ४ कप ताकासाठी १ ते दीड मोठा चमचा बेसन पुरेसे होते.
२. ताक आणि बेसन एकत्र छान फेटून घ्या
फोडणीत ताक घालण्यापूर्वीच, ताक आणि बेसन एकत्र करून रवीने किंवा व्हिस्करने छान फेटून घ्या. त्यात बेसनाच्या गुठळ्या अजिबात राहता कामा नयेत. गुठळ्या राहिल्यास कढी फुटण्याची शक्यता वाढते.
३. मीठ शेवटी घाला
कढी फुटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात सुरुवातीलाच मीठ घालणे. कढीला पूर्ण उकळी आल्यानंतर आणि गॅस बंद करण्याच्या २-३ मिनिटे आधी मीठ घालावे. सुरुवातीला मीठ घातल्यास ताक लगेच फुटते.
४. कढी सतत ढवळत राहा
ताकाचे मिश्रण कढईत ओतल्यापासून ते कढीला पहिली उकळी येईपर्यंत चमच्याने ते सतत एकसारखे ढवळत राहा. ढवळणे थांबवल्यास ताक तळाशी लागून किंवा उष्णतेमुळे फुटू शकते.
५. गॅसची आंच मंद ठेवा
कढी नेहमी मंद ते मध्यम आचेवरच शिजवावी. मोठ्या आचेवर ताक अचानक गरम झाल्यामुळे लगेच फुटते आणि कढीला हवी तशी चव येत नाही.
६. कढी ओतताना गॅस बारीक करा किंवा बंद करा
फोडणी तयार झाल्यावर जेव्हा तुम्ही त्यात ताकाचे मिश्रण ओतता, तेव्हा गॅस एकदम बारीक करा किंवा शक्य असल्यास १ मिनिटासाठी गॅस बंद करा. फोडणी खूप जास्त कडकडीत गरम असेल आणि त्यात थंड ताक टाकले, तरीही कढी फुटते.
७. खूप जास्त आंबट ताक वापरू नका
ताक मध्यम आंबट असावे. खूप जास्त आंबट किंवा शिळे ताक असेल, तर उष्णता मिळताच त्याचे पाणी आणि चक्का वेगळा होऊ लागतो. ताक जास्त आंबट असल्यास त्यात थोडे दूध किंवा पाणी मिसळून त्याचा आंबटपणा कमी करून घ्या.
८. कढी उकळताना झाकण ठेवू नका
कढी शिजत असताना कढईवर कधीही पूर्ण झाकण ठेवू नका. झाकण ठेवल्याने आत वाफ निर्माण होते आणि कढी फुटून पाणी मोकळे होते. कढी नेहमी उघड्या भांड्यात ठेवूनच उकळावी.
