विदेशी पर्यटकांना रत्नागिरीमधील दापोलीतील समुद्रकिनाऱ्याची भुरळ, सुमारे ५० पर्यटक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 13:57 IST2022-11-19T13:55:38+5:302022-11-19T13:57:06+5:30
पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज.

विदेशी पर्यटकांना रत्नागिरीमधील दापोलीतील समुद्रकिनाऱ्याची भुरळ, सुमारे ५० पर्यटक दाखल
शिवाजी गोरे
दापोली : तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर देशातील विविध भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होतात. आता विदेशी पर्यटकांनाही येथील समुद्रकिनार्याची भुरळ पडली असून कर्दे मुरुड समुद्रकिनाऱ्याची भुरळ आता विदेशी पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. यामध्ये जर्मनी व ऑस्ट्रेलिया देशातील सुमारे ५० पर्यटक दाखल झाले आहेत.
देशातील विविध भागातून या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, गोव्याकडे विदेशी पर्यटकांचा ओढा अधिक असतो. परंतु या पर्यटकांना आता कोकणातील समुद्रकिनारे खुणावत आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरही विदेशी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. दापोलीतील कर्दे समुद्रकिनाऱ्यावर जर्मनी, ऑस्ट्रेलिया देशातील पर्यटक आपल्या वाहनांसह दाखल झाले होते.
या विदेशी पर्यटकांनी याठिकाणी दोन दिवस मुक्काम केला. यानंतर ते गोव्याच्या दिशेने रवाना झाले. भारत भ्रमणासाठी निघालेल्या विदेशी पर्यटकांनी चक्क मुरुड करदे समुद्रकिनारा पसंती दिली. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी विदेशी पर्यटक येऊ शकतात. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परिणामी पर्यटन व्यवसायासाठी चांगले दिवस येण्याची शक्यता असून पर्यटन व्यवसायाला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. विदेशी पर्यटक कोकणात दाखल झाले तर गोव्याच्या धर्तीवर कोकणातील समुद्रकिनाऱ्यांनाही 'ग्लोबल टच' मिळू शकतो.
पायाभूत सुविधांची वानवा
पर्यटन स्थळाकडे जाणारी अरुंद रस्ते, इंटरनेट, मोबाईल रेंजचा अभाव, किनाऱ्यावर पायाभूत सुविधांची वानवा यामुळे याठिकाणी पर्यटक थांबत नाहीत. किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारची सुविधा नसतानाही अनेक पर्यटक याठिकाणी दाखल होतात. मात्र, सुविधा नसल्याने ते गोव्याच्या दिशेने जातात. त्यामुळे याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.