रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणूक: भाजपचा उमेदवार आज ठरणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 13:25 IST2019-12-07T13:24:28+5:302019-12-07T13:25:01+5:30
रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी २५ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे.

रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणूक: भाजपचा उमेदवार आज ठरणार ?
रत्नागिरी : थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक यावेळी चांगलीच रंगण्याची चिन्ह आहेत. शहर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून मिलिंद कीर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर ३० वर्षांची मैत्री तुटल्यानंतर शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बंड्या साळवी यांच्यासमोर भाजपचा उमेदवारही निवडणूक आखाड्यात उतरविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे रत्नागिरी प्रभारी प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे आणि नीलेश राणे हे शनिवारी रत्नागिरीत येत असून, या दिवशी भाजपचा उमेदवार कोण हे ठरण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी २५ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे सध्याचे प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेली युती निवडणुकीनंतर तुटल्याने आता भाजप ही शिवसेना विरोधात आक्रमक झाली आहे.
रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे राजेश सावंत, भाऊ शेट्ये, राजीव कीर तसेच मुन्ना चवंडे यांची नावे चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी कोणत्या नेत्याला उमेदवारी द्यावी, याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भाजपचे नेते शनिवारी रत्नागिरी येत असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी प्रसारमाध्यमांना शुक्रवारी दिली.
अॅड. पटवर्धन म्हणाले, रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूक ही रत्नागिरीकरांवर लादलेली आहे. निवडणुकीबाबत जनतेत संताप आहे. त्यामुळेच या निवडणुकीत भाजप आक्रमकपणे भाग घेणार आहे. शनिवारच्या नेत्यांच्या सभेत उमेदवार कोण हे निश्चित होईल, असे सांगितले.