Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 11:47 IST2025-08-29T11:44:56+5:302025-08-29T11:47:02+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथील भोस्ते गावात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना अत्यंत दुर्दैवी घटना घडली.

Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथील भोस्ते गावात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना दोन जण जगबुडी नदीत बुडाले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या तरुणाने कसेबसे पोहत किनारा गाठला. गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगेश पाटील (वय, ४०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगेश पाटील हे खेड तालुक्यातील भोस्ते पाटीलवाडीचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. यावर्षी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. दरम्यान, गुरुवारी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मंगेश पाटील आणि त्यांच्यासोबत आणखी एक तरुण नदीपात्रात उतरले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाण्यात बुडू लागले. त्यापैकी दुसर्या तरुणाने कसेबसे पोहत किनारा गाठला. पण मंगेश पाटील हे पाण्यात बुडाले.
Ratnagiri, Maharashtra: During Ganesh Visarjan at Bhoste village, two people were swept away by the strong current of the Jagbudi River. While one survived, 40-year-old Mangesh Patil drowned. Rescue operations by local authorities and an NDRF team are ongoing pic.twitter.com/6wsnkFMuat
— IANS (@ians_india) August 29, 2025
या घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेचे अग्निशामक दल, खेड शहरातील विसर्जन कट्टा पथक तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. सर्व यंत्रणेने तातडीने मंगेश पाटील यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरु होता.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माजी आमदार संजय कदम यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच खेड तालुका प्रशासन अधिकारी, खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनीही घटनास्थळी हजेरी लावून मदतकार्यात समन्वय साधला.