ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांसाठी व्हावा, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:51 IST2025-05-15T12:51:06+5:302025-05-15T12:51:17+5:30

दापोली कृषी विद्यापीठात पदवीदान समारंभ

Farmers should benefit from knowledge Governor C. P. Radhakrishnan expressed his opinion | ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांसाठी व्हावा, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं मत

ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांसाठी व्हावा, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं मत

दापोली : विद्यार्थ्यांनी मिळालेल्या पदवीचा, ज्ञानाचा, केलेल्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करून द्यावा. देशाच्या शेती उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक प्रात्यक्षिकांवर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४३ वा पदवीदान समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, कुलगुरू डॉ. संजय भावे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, कोकण कृषी विद्यापीठाने बदलत्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता सातत्याने दाखवून दिली आहे. विद्यापीठाची महाविद्यालये आणि संशोधन केंद्रे शेती, फलोत्पादन, मत्स्यपालन, कृषी अभियांत्रिकी, वनीकरण किंवा कापणीनंतरचे तंत्रज्ञान अशा बहुआयामी संशोधनात गुंतलेली आहेत. कोकणातील हापूस आंबा जगभर प्रसिद्ध आहे. विद्यापीठाच्या कलम आणि उत्पादन तंत्रांमुळे या प्रदेशात आंबा लागवडीचा विस्तार झाला आहे.

कृषिमंत्री कोकाटे यांनी विद्यापीठाच्या कामाचे कौतुक करतानाच क्लायमेट स्मार्ट शेतीसाठी युद्धपातळीवर संशोधन आराखडा तयार करावा, असे आवाहन केले. बदलत्या वातावरणात तग धरून राहणारे अधिक उत्पादनक्षम वाण निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोकणातील जैवविविधता लक्षात घेऊन ऊर्जा शेती तसेच पशुधन शेती पद्धतीतील संधीचा शोध घेणे या गोष्टीही आवश्यक आहेत, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात कितीही मोठे झाले तरी, शिक्षकांना, विद्यापीठाला विसरू नये. त्यांच्या शिक्षणाचा देशाला, राज्याला कसा फायदा होईल याकडे लक्ष द्यावे. भारतातून इंग्रज निघून गेले असले तरी पदवीदान समारंभाला गाऊन घालण्याची पद्धत अजून आहे. हा पेहराव बदलून पारंपरिक पेहराव करण्याच्या दृष्टीने कोकण कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री असताना पुणे विद्यापीठासह अन्य विद्यापीठांना स्वायत्तता दिल्याने मराठमोळा पेहराव समोर आला आहे. यावेळी पीएचडीधारक, सुवर्णपदकधारक विद्यार्थ्यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करण्याच्या धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण, मातीतील कार्बनचे प्रमाण शोधणे, मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती मिळविणे, तणाचा प्रकार ओळखणे, पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना, मातीचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकावरील रोग व किडींचा प्रादुर्भाव ओळखणे, पिकावरील जैविक, अजैविक ताण ओळखणे या सर्व गोष्टी शेतकऱ्यांच्या हातात येणार आहेत, असे मंत्री कोकाटे यांनी सांगितले.

Web Title: Farmers should benefit from knowledge Governor C. P. Radhakrishnan expressed his opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.