Ratnagiri: दापोलीत उपोषणकर्त्याला मारहाण, अभियांत्रिकी सहायकाचे कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:46 IST2025-02-01T13:46:21+5:302025-02-01T13:46:57+5:30

तक्रारीनंतर रत्नागिरीला बदली

Engineering assistant beats up hunger striker in Dapoli | Ratnagiri: दापोलीत उपोषणकर्त्याला मारहाण, अभियांत्रिकी सहायकाचे कृत्य 

Ratnagiri: दापोलीत उपोषणकर्त्याला मारहाण, अभियांत्रिकी सहायकाचे कृत्य 

दापोली (जि. रत्नागिरी) : आपल्या विरोधात उपोषण केले म्हणून एका अधिकाऱ्याने उपोषणकर्त्याला कार्यालयातच मारहाण केल्याचा प्रकार दापोलीमध्ये घडला आहे. हा अधिकारी मद्यपान करूनच कार्यालयात आले असल्याची तक्रार या उपोषणकर्त्याने पोलिसांकडे केली आहे.

दापोली येथील मयूर मोहिते हे माहिती अधिकार कार्यकर्ते २६ जानेवारी रोजी पत्तन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात दापोली येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. त्यांनी या कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक राकेश रमेश जाधव यांची बदली करावी व त्यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार अधीक्षक अभियंता यांनी राकेश जाधव यांची रत्नागिरी येथील कार्यालयात तात्पुरती बदलीही केली होती.

शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मयूर मोहिते हे पत्तन विभागाच्या कार्यालयात कागदपत्र घेण्यासाठी गेले होते. तेथून ते बाहेर पडत असताना राकेश जाधव तेथे आले. त्यांनी मोहिते यांना शिवीगाळ केली. कमरेत लाथ मारली. डोक्यावरही मारले. मात्र, मोहिते यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने ते बचावले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले अभियंता दिनेश पंडित व अमोल कांबळे यांनी राकेश जाधव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही ते आवरत नव्हते. मयूर मोहिते हे तक्रार देण्यास पोलिस स्थानकात गेल्यावर राकेश जाधव कार्यालयातून निघून गेले.

तक्रार दाखल

मयूर मोहिते यांनी राकेश जाधव यांच्याविरोधात दापोली पोलिस स्थानकात मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. जाधव यांच्या तोंडाला मद्याचा वास येत असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. जाधव यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Engineering assistant beats up hunger striker in Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.