Ratnagiri: दापोलीतील सुवर्णदुर्ग रोप-वेला केंद्र सरकारचा हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:04 IST2025-03-21T14:03:40+5:302025-03-21T14:04:14+5:30
दापाेली : केंद्र शासनाच्या पर्वतमाला याेजनेंतर्गत दापाेली तालुक्यातील गाेवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला अशा राेप-वेला केंद्र सरकारने हिरवा कंदील ...

संग्रहित छाया
दापाेली : केंद्र शासनाच्या पर्वतमाला याेजनेंतर्गत दापाेली तालुक्यातील गाेवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला अशा राेप-वेला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. या प्रकल्पासाठी सामाजिक कार्यकर्ते मिहीर दीपक महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला हाेता.
मिहीर महाजन यांनी दिल्ली येथे २०२०च्या ऑक्टोबर महिन्यात मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राेप-वेबाबत मागणी केली हाेती. त्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव करून आणा, मी हा रोप-वे करून देतो, अशी सूचना केली हाेती.
मिहीर महाजन यांनी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांचे सहकार्य घेतले. याबाबत राज्याचे तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेत या रोप-वेसाठी आग्रह धरला असता, त्यांनी पर्यटन विभागाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. तत्कालीन सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत चर्चा केली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रोप-वेची शिफारस करणारे पत्र दिले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या १८ फेब्रुवारी राेजी झालेल्या बैठकीत या रोप-वेला हिरवा कंदील देण्यात आला आहे. केंद्र सरकारचे एनएचएलएम आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग या रोप-वेचे काम कार्यान्वित करणार असल्याचा शासन निर्णय दि. १९ मार्च रोजी काढण्यात आला. त्यामुळे गाेवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला असा राेप-वे हाेणार आहे.