Ratnagiri: गुहागरमध्ये पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:16 IST2025-08-12T16:15:35+5:302025-08-12T16:16:43+5:30
सर्व महिलांची प्रकृती स्थिर

Ratnagiri: गुहागरमध्ये पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल
गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील एका बेकरीमधून आणलेला पेढा खाल्ल्याने ज्वेलरीच्या दुकानात काम करणाऱ्या ११ महिलांना विषबाधा झाल्याचा प्रकार साेमवारी सकाळी घडला. या महिलांना तत्काळ शृंगारतळीतील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
शृंगारतळी येथील ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या पाठीमागे एका इमारतीत ज्वेलरीचे दुकान आहे. ज्वेलरीचे मालक महिलांच्या हाताला काम मिळावे म्हणून मुंबईहून ज्वेलरीचे साहित्य आणून ते महिलांकडे देतात. त्यातून या महिला ज्वेलरी तयार करतात. श्रावण महिना असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या एका महिलेने साेमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका बेकरीतून पेढे आणले हाेते. त्यातील अर्धा-अर्धा पेढा कामावर असलेल्या महिलांना तिने दिला. काही वेळाने महिलांना चक्कर आली आणि उलटी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सर्व महिलांना तातडीने शृंगारतळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यामध्ये स्वप्नाली पवार, प्रतीक्षा मोहिते, पूजा मोहिते, वृषाली पवार, विदिशा कदम, सोनाली नाईक, मधुरा घाणेकर, निकिता गमरे, प्रिया मोहिते, संजना गिरी व मानसी शिगवण या महिलांचा समावेश आहे. या सर्व महिला गुहागर तालुक्यातील तळवली, मळण, पालपेणेमधील राहणाऱ्या आहेत.
या महिलांनी श्रावणी सोमवारचा प्रसाद म्हणून अर्धा-अर्धा पेढा खाल्ला व काही वेळातच त्यांना चक्कर व उलट्या होण्यास सुरुवात झाली. महिलांनी खाल्लेल्या पेढ्यामुळे त्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या महिलांवर उपचार करणाऱ्या डॉ. राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सर्व महिलांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.