दुर्गम ठिकाणच्या मतदान केंद्रांवरही पोहोचले कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 06:13 IST2019-04-28T23:58:41+5:302019-04-29T06:13:25+5:30
मावळ मतदारसंघात आज निवडणूक : चार मतदान केंद्र दुर्गम भागात

दुर्गम ठिकाणच्या मतदान केंद्रांवरही पोहोचले कर्मचारी
अलिबाग : मावळ मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रि या पार पडणार आहे. मावळ मतदारसंघामध्ये पनवेल, उरण आणि कर्जत तालुक्याचा समावेश होतो; परंतु येथील चार ठिकाणची मतदान केंद्र अतिशय दुर्गम भागामध्ये आहेत. तेथे जाण्यासाठी साधी पायवाट आहे. कर्जत तालुक्यातील चार दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन पोहोचणे मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांना फारच आव्हानात्मक होते. येथील ९१५ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी खडतर प्रवास करत या ठिकाणीही अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले आहेत.
या मतदार केंद्रावर वाहन जात नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेड्यावाकड्या वाटांवरून, ओढ्या-नद्यांमधून, डोंगर-कपारीतून मजलदरमजल करत इच्छित स्थळी पोहोचले. त्या वेळी त्यांच्या चेहºयावरील आनंद सुखावणारा होता. ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत हे तीन तालुके मावळ मतदारसंघात येतात. यातील कर्जतमधील ५४ क्र मांकाचे केंद्र तुंगी येथे आहे. डोंगरमाथ्यावरील या गावात ३४४ मतदार आहेत. मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर २७ कि.मी. आहे. केवळ कच्च्या रस्त्याने अथवा पायवाटेनेच या ठिकाणी पोहोचता येते. २७४ मतदारसंख्या असलेले पेठ या ठिकाणीदेखील १०१ क्र मांकाचे मतदान केंद्र आहे. या ठिकाणी जीपने जाता येते. मात्र, रस्ता अवघड आहे. मध्यवर्ती मतदान केंद्रापासून हे अंतर २४ कि.मी. आहे. १७७ मतदार असलेले ढाक या वाडीमध्ये १५६ क्रमांकाचे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. येथील अंतर १० कि.मी. आहे. येथेही अवघड अशा रस्त्याने जावे लागते. १०० मतदार असलेले कळकराई हे १७९ क्र मांकाचे मतदान केंद्र आहे. या ठिकाणीदेखील लहान वाटेने जावे लागते. स्थानिक ग्रामस्थ, तलाठी यांनी कर्मचाऱ्यांना सर्व साहित्य वाहून नेण्यासाठी मदत केली