निवडणुकीच्या नियोजनामध्ये सावळागोंधळ, मतदारांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:48 IST2019-04-30T23:48:16+5:302019-04-30T23:48:56+5:30
मावळ लोकसभेअंतर्गत येणाऱ्या १८९ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने मतदारांना देण्यात येणाºया सुविधेबद्दल जी जाहिरातबाजी केली ती फोल ठरली.

निवडणुकीच्या नियोजनामध्ये सावळागोंधळ, मतदारांची गैरसोय
कर्जत : मावळ लोकसभेअंतर्गत येणाऱ्या १८९ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधेबद्दल जी जाहिरातबाजी केली ती फोल ठरली. अनेक केंद्रांमध्ये या सुविधांचा अभाव दिसून आला. सकाळपासूनच कर्जत तालुक्यातील मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. तरुणांनी आपले पहिलेच मतदान असल्याने मतदानाचा हक्क बजावला तर कडक उन्हाळा जाणवत असताना सुद्धा वृद्ध, दिव्यांग मतदारांनी आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले. कर्जत जीवन शिक्षण मंदिर शाळेत १६३ मतदान केंद्राची खोली लहान होती व त्याचा बाहेरचा व्हरांडा लहान असल्याने या ठिकाणी मतदारांची गर्दी झाली होती. भर उन्हात मतदानासाठी आलेल्या मतदारांना त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली नसल्याने तेथे उपस्थित मतदारांनी खेद व्यक्त केला. रवींद्र दातार यांनी याप्रसंगी नाराजी व्यक्त केली. मात्र, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी त्यानंतर पाण्याची व्यवस्था केली. व्हिलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय केली आहे असे असताना व्हिलचेअर दिसत होती, मात्र स्वयंसेवक नव्हते. मतदान केंद्रावर प्रथमोपचार, पिण्याचे पाणी याची सोय अशी जाहिरात होती. अशा अनेक सुविधा राष्ट्रीय महोत्सव मतदारांसाठीच्या माहिती पुस्तिकेवर छापल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात त्या मतदारांना मिळाल्या नाहीत. काही ठिकाणी प्रत्यक्ष मतदान करताना पुरेसा प्रकाशही नव्हता. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाराजी व्यक्त केली.
नवीन मतदारांनी नोंदणी करूनही काहींचे नाव मतदारयादीत आले नाही, तर काहींच्या नावात गडबड झाली. कुणाच्या नावाऐवजी वडिलांचे नाव तर कुणाच्या वडिलांऐवजी आईचे नाव आल्याने त्या नवमतदारांना मतदान करता आले नाही. मतदान केंद्रात ज्या टेबलवर ईव्हीएम मशिन ठेवण्यात येते त्या मशिनच्या पुढे मतदारांनी कोणाला मत दिले आहे हे दिसू नये म्हणून जे गार्ड (कागदी पुठ्ठा लावला जातो) त्यामुळे ईव्हीएम मशिनच्या वरच्या नावावर चिन्हावर काळोख पडतो, चिन्ह लहान असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चिन्ह शोधण्यास त्रास होतो. मशिनच्या वर लाइटची सोय करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक मतदानानंतर करत होते.