'मविआ'तील बंडखोरी भाजपच्या पथ्यावर?
By वैभव गायकर | Updated: January 12, 2026 12:22 IST2026-01-12T12:21:12+5:302026-01-12T12:22:04+5:30
ही लढाई एकटा भाजप आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष अशीच आहे.

'मविआ'तील बंडखोरी भाजपच्या पथ्यावर?
वैभव गायकर
पनवेल शहर हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. ते तिसरी मुंबई परिसरात असल्याने भविष्यातील महानगर म्हणून त्याची ओळख निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळही या महापालिकेच्या हद्दीत असल्याने त्याची सत्ता काबीज करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजे, नवीन पनवेल, असे सिडकोचे पाच नोड, पूर्वाश्रमीची पनवेल नगर परिषद आणि २९ गावे, असा ११० चौ. किमीचा परिसर महापालिकेत मोडतो.
पनवेल महापालिकेची पहिली निवडणूक (२०१७) भाजपने एकहाती जिंकली होती. त्यामुळे यावेळी भाजपने सर्व अधिकार स्वतःकडे ठेवून मित्रपक्षाला मोजक्या जागा सोडल्या आहेत. थोडक्यात सत्तेच्या चाव्या आपल्याकडेच ठेवल्या आहेत. भाजपला मात देण्यासाठी शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेना, मनसे, सप हे पक्ष एकवटले आहेत. त्यामुळे ही लढाई एकटा भाजप आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष अशीच आहे.
पनवेलचे भाजप आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक लढवत आहे, तर महाविकास आघाडीच्या वतीने माजी आ. बाळाराम पाटील एकतर्फी किल्ला लढवत आहेत. भाजप विकासाच्या मुद्द्यावर, तर महाविकास आघाडीने भ्रष्टाचार, अपुरा पाणीपुरवठा, प्रदूषण आणि मालमत्ता कराच्या मुद्यांवर भर देत आहे.
भाजपने प्रचारात मातब्बर नेतेमंडळींना उतरवले आहे. मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री गोपी सुरेश गोपी, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, आ. गोपीचंद पडळकर आदींनी भाजप महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कळंबोलीत गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. तर, महाविकास आघाडीचे मोठे नेते प्रचारासाठी आलेले नाहीत. मोजके नेते प्रचारार्थ आले होते. त्यात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आदींचा समावेश आहे. पुढील दोन दिवसांत काही नेते राजकीय वातावरण तापविण्यासाठी येतील. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे २१ जागांवर निवडणूक लढत आहेत. पक्षाचे नेते सुजात आंबेडकर आपल्या उमेदवारांचे मनोबल वाढविण्यासाठी पनवेलमध्ये येऊन गेले.
सात नगरसेवकांची बिनविरोध निवड चर्चेत
पनवेल महापालिकेत भाजप आणि महाविकास आघाडीत तुल्यबल लढत होईल, असे प्रारंभी मानले जात होते; मात्र निवडणुकीपूर्वीच भाजपचे सात नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने ही लढाई आता बरोबरीची राहिली नाही, असे मानले जाते. त्यातच महाविकास आघाडीतील बंडखोरांची संख्या भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.