पनवेल: प्रचाराचे ९ दिवस, पायाला भिंगरीच लावावी लागणार ! वैयक्तिक भेटीगाठींवर आली संक्रांत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:47 IST2026-01-06T13:46:25+5:302026-01-06T13:47:29+5:30
पनवेल महापालिकेची २० प्रभागातून ७८ जागांसाठी निवडणूक

पनवेल: प्रचाराचे ९ दिवस, पायाला भिंगरीच लावावी लागणार ! वैयक्तिक भेटीगाठींवर आली संक्रांत?
कळंबोली: पनवेल महापालिकेच्या रणधुमाळीत प्रचाराचे खरे काउंटडाउन सुरु झाले असून प्रचारासाठी उमेदवारांच्या हातात अवघे ९ दिवस उरले आहेत. इतक्या कमी कालावधीत प्रभागांतील हजारो मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे, या चिंतेने उमेदवारांची झोप उडवली आहे.
पारंपरिक रॅली, कॉर्नर सभा, सोशल मीडिया या माध्यमांद्वारे प्रचार केला जात आहे. पनवेल महापालिकेची २० प्रभागातून ७८ जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे. शनिवारपासूनच प्रचाराचा नारळ फुटला आहे. जास्तीज जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सध्या उमेदवारांची धावपळ सुरू आहे.
प्रभाग मोठे, पोहोचणार कसे ?
चार सदस्य प्रभाग पद्धतीमुळे प्रत्यक्ष भेटीसाठी अधिकचा वेळ लागणार आहे. ज्यांचे प्रभाग मोठे आहेत, त्यांना जेवणाला वेळ, विश्रांतीलाही उसंत मिळणार नाही. किमान १ हजार मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधावा म्हटल्यास, ९ दिवस अपूर्ण पडणार आहेत. सकाळी ७ ते रात्री १० रॅली काढल्या तरी प्रत्येक गल्ली, घरापर्यंत पोहोचणे मोठे आव्हान ठरणार आहे.
वैयक्तिक भेटीगाठींवर आली संक्रांत?
राजकारणात डोअर टू डोअर प्रचाराला मोठे महत्त्व आहे. मात्र, ३ जानेवारीनंतर केवळ ९ दिवस हातात असल्याने, वैयक्तिक भेटीऐवजी कोपरासभा आणि रॅलींवर भर दिला जाणार आहे. यात मतदारांच्या मनात नेमके स्थान कसे निर्माण करायचे, असा प्रश्न नवीन उमेदवारांना सतावत आहे.
कार्यकर्त्यांच्या फौजा दारात
एकाच वेळी चार-चार उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या फौजा दारात येणार असल्याने मतदारांचीही स्थिती 'अतिथी देवो भव' ऐवजी 'कधी जाताय' अशी होण्याची शक्यता आहे.