पनवेल पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी मैदानांची चाचपणी; भाजपचा कळंबोलीत केवळ एकमेव अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:22 IST2026-01-06T13:22:29+5:302026-01-06T13:22:57+5:30
कळंबोलीमधील मैदानात भव्य सभेसाठी भाजपने रीतसर अर्ज केला आहे.

पनवेल पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी मैदानांची चाचपणी; भाजपचा कळंबोलीत केवळ एकमेव अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: महापालिकेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुरळा उडाला असताना पुढील काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी सभा महत्त्वाचे फॅक्टर ठरणार आहेत. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी चाचपणीला सुरुवात केली आहे. महापालिका क्षेत्रातील १४ मैदानांसाठी मोठ्या प्रमाणात परवाना विभागाला विचारणा होत आहे. यापैकी कळंबोलीमधील मैदानात भव्य सभेसाठी भाजपने रीतसर अर्जदेखील केला आहे.
निवडणुकीत प्रचारसभा हा महत्त्वाचा भाग समजला जातो. या परिस्थितीत उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठमोठे नेते प्रचारासाठी आणले जातात. राज्यात भाजप-शिंदे महायुतीची सत्ता असल्याने आमदार प्रशांत ठाकूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पनवेलमध्ये आणणार आहेत. या निवडणुकीत भाजपने निवडणुकीपूर्वीच आपले खाते उघडून विजयाचा षटकार मारला आहे. त्यामुळे भाजप एक पाऊल पुढे टाकत विरोधकांचे नामोहरण करण्याचे काम करीत आहे.
कळंबोली सेक्टर १९ मध्ये १२ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. विशेष म्हणजे भाजपने विचारपूर्वक कळंबोली हे ठिकाण सभेसाठी निवडले आहे. पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी याठिकाणी भाजपाची ताकद असल्याने याठिकाणी भाजपची लढाई सोपी राहणार आहे. तुलनेत कळंबोलीमधील मराठी मतदार आणि या शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात भाजपला हवे तसे यश अद्याप न मिळाल्याने भाजपने कळंबोली हे ठिकाण निवडले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील मैदाने
- खारघर
- तळोजा २
- कळंबोली ५
- कामोठे
- नवीन पनवेल २
- पनवेल शहर १
जयंत पाटलांच्या आगमनाची प्रतीक्षा
एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला राहिलेल्या पनवेलमधील कोणत्याच निवडणुका आजतागायत शेकाप सरचिटणीस यांच्याशिवाय पार पडलेल्या नाहीत. स्वतः जयंत पाटील जातीने हजर राहून या निवडणुका खांद्यावर घेत असताना मतदानाला काही दिवस शिल्लक राहिलेले असताना अद्याप ते पनवेलमध्ये फिरकले नाहीत. त्यांची प्रतीक्षा शेकाप कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.
आघाडीचे नेते अडकले स्वतःच्या प्रचारात
महाविकास आघाडीत अनेक नेते स्वतःची उमेदवारी घेऊन मोकळे झाले आहेत. त्यामुळे आघाडीचे नेते बाळाराम पाटील एकटे पडले आहेत. सर्व निवडणुकीत एकमेव नेते बाळाराम पाटील संपूर्ण पालिका क्षेत्रात फिरत आहेत. स्वतःच्या प्रचारात गुंतलेले महाविकास आघाडीचे बहुतांशी तीन नेत्यांना वेळ देता येत नसल्याची स्थिती पनवेलमध्ये आहे. त्या तुलनेत भाजप नियोजनाच्या बाबतीत विरोधकांवर कुरघोडी करताना दिसून येत आहे.