महेंद्र दळवी यांच्या विजयाचा मुरुडमध्ये जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 00:12 IST2019-10-24T23:45:50+5:302019-10-25T00:12:03+5:30
अलिबाग-मुरुड मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केल्यावर मुरुड बाजारपेठेत असंख्य शिवसैनिकांनी नाक्यावर उतरून फटाक्याची आतशबाजी करून आपला आनंद व्यक्त केला.

महेंद्र दळवी यांच्या विजयाचा मुरुडमध्ये जल्लोष
मुरुड : अलिबाग-मुरुड मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केल्यावर मुरुड बाजारपेठेत असंख्य शिवसैनिकांनी नाक्यावर उतरून फटाक्याची आतशबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. यामध्ये असंख्य मुस्लीम युवक सहभागी झाले होते. महेंद्र दळवी आगे बढोच्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता.
शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते बाजारपेठ येथे जमून फटाक्यांची आतशबाजी करून तद्नंतर ढोल-ताशांच्या गजरात नाचत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्वत्र भगवे झेंडे फडकत होते. गुलाल उडवून मोठा आनंद व्यक्त करण्यात येत होता. तरुणांचा जल्लोष खूप मोठा दिसून आला. भगवे झेंडे, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा गर्जना देत ही मिरवणूक संपूर्ण मुरुड शहरात फिरवण्यात आली. शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडित पाटील यांच्यात लढत होऊन शिवसेनेचे दळवी हे मोठ्या मताधिक्याने विजयी घोषित करताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
मुस्लीम लोकांचासुद्धा या मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. अलिबाग-मुरुड हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असताना शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी ३० हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयश्री मिळवल्याने या बालेकिल्ल्यास मोठे भगदाड पाडण्यात दळवी हे यशस्वी ठरले आहेत. शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत ही मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली. ही मिरवणूक संपूर्ण शहरात फिरवण्यात आली. शेकडोच्या संख्येने लोक एकत्र आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले.