रेल्वे आली असती तर मुंबई प्रवास सोपा झाला असता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 04:37 IST2019-04-06T04:36:48+5:302019-04-06T04:37:19+5:30
३0 मिनिटांचा प्रवास । एसटीच्या लाल डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’. पेण ते अलिबाग 30 किमी

रेल्वे आली असती तर मुंबई प्रवास सोपा झाला असता
अलिबाग : अलिबागला रेल्वे आली असती तर आज परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असता... रेल्वे स्टेशन झाले असते तर, रोजगार निर्माण झाला असता... अलिबाग-मुंबई असा रोजचा प्रवास करणे सोपे झाले असते अशी प्रतिक्रिया पेण ते अलिबाग ३० किमी प्रवासादरम्यान रायगड मतदार संघातील मतदारांशी संवाद साधताना ‘लोकमत’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त करण्यात आली.
मुंबईपासून रायगड जिल्हा हाके च्या अंतरावर आहे. मात्र, जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. याला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी राजकीय नेते जबाबदार आहेत. शिवसेनेचे अनंत गीते काही तरी करतील म्हणून मतदारांनी त्यांना निवडून दिले. निवडून आल्यावर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री यांनी अलिबागला रेल्वे आणण्याचे जाहीर केले. त्यांच्या खासदारकीची टर्म संपत आली. त्यांनी रेल्वे काय हवेत उभारली काय? असा खणखणीत सवाल पोयनाड येथील मयूर तुपे याने केला.
जिल्ह्यामध्ये कंपन्या येण्याआधी त्या कोणत्या स्वरूपाच्या येणार आहेत हे लोकप्रतिनिधींना माहिती असते. त्यामुळे त्या कंपन्यांना आवश्यक असणारे स्कील डेव्हलप करण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थाने पुढाकार घ्यायला पाहिजे, असे नयन पाटील या युवकाने स्पष्ट केले. जिल्ह्यात चांगले मेडिकल कॉलेज, आरोग्य सुविधा उभारणे गरजेचे आहे. छोट्या-मोठ्या आजारासाठी स्थानिकांना मुंबईची वाट धरावी लागते. आर्थिकदृष्ट्या
दुर्बल असणाऱ्यांना ते परवडत नाही. त्यामुळे निवडून येणाºया खासदारांनी चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत शिरवलीची सोनाली तणपुरे हिने व्यक्त केले. ६७ टक्के जनता ग्रामीण भागात राहते आणि त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. परंतु शेती आणि शेतकऱ्यांसाठी सरकारकडे चांगली धोरणे नाहीत. वर्षाला शेतकºयांना सहा हजार रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, त्या सहा हजार रुपयांमध्ये काय होणार असा सवाल जयश्री पाटील यांनी केला. शेतकºयांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली आठ वर्षे रडतखडत सुरू आहे. त्या कामाला द्रुतगती मिळाली पाहिजे. काम लवकर पूर्ण झाले तर अलिबाग, रोहा, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन आणि तळ कोकणातील प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचेल. यासाठी आधीचे आणि आताचे सरकार गंभीर दिसत नाही असे रवि पाटील यांनी सांगितले.
आश्वासने खोटी ठरली
गीतेंनी अलिबागला रेल्वे आणण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात पाच वर्षे संपत आली तरी, रेल्वेचा एकही रुळ लागला नाही अथवा अस्तित्वातील रुळावरून रेल्वे धावली नाही. भाजप आश्वासनांप्रमाणे शिवसेनेच्या गीतेंची आश्वासने खोटी ठरली. रायगड आणि रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, ते पाणी अडवण्यासाठी धरणांची उभारणी झाली नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.