चर्चा सफल होईना... जागा वाटप ठरेना... पनवेलमध्ये भाजप-शिंदेसेना युतीची चर्चा फिस्कटली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:40 IST2025-12-28T13:39:17+5:302025-12-28T13:40:13+5:30
Panvel Municipal Corporation Election: शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलावून स्वबळावर लढण्याची तयारी निश्चित केली आहे.

चर्चा सफल होईना... जागा वाटप ठरेना... पनवेलमध्ये भाजप-शिंदेसेना युतीची चर्चा फिस्कटली !
Panvel Municipal Corporation Election | लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: दोन आठवड्यांपासून भाजप-शिंदेसेनेची जागा वाटपाची चर्चा अद्यापही सुरूच आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना एका बाजूला मित्रपक्षांना झुलवत ठेवत २० प्रभागांतील काही जागांवर भाजपने त्यांची उमेदवारी निश्चित केले आहेत. या उमेदवारांचे फॉर्मदेखील भरण्यात आले आहेत. दरम्यान, शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलावून स्वबळावर लढण्याची तयारी निश्चित केली आहे.
शिंदेसेनेला हव्यात १० जागा
प्राथमिक स्वरूपात भाजप शिंदेसेनेला चर्चेत गुंतवून ठेवत असल्याची धारणा शिंदेसेनेची झाली आहे. शिंदेसेनेचा १० जागांचा प्रस्तावदेखील भाजपने धुडकावून लावला आहे. दोन्ही सेना एकत्र असतानादेखील २०१७मध्ये शिवसेनेला एकही नगरसेवक संपूर्ण महापालिका क्षेत्रातून निवडून आणता आला नव्हता. त्यामुळे भाजप शिंदेसेनेला ५ जागादेखील देण्याच्या भूमिकेत नाही.
भाजपमधील अनेकजण प्रतीक्षेत
कळंबोलीमधील दोन जागा वगळता भाजप आपल्या स्टैंडिंग जागा सेनेला सोडू इच्छित नाही. त्यामुळे नगरसेवकपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून शिंदेसेनेत गेलेल्यांची चांगली गोची झाली आहे. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्याशी भाजप-शिंदेसेनेच्या युतीबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. भाजपने ठराविक इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना केल्याने उर्वरितांची झोप उडाली आहे.
सोमवारी यादी जाहीर करणार
भाजपची महायुतीमधील शिंदेसेना, आरपीआय आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युतीची चर्चा सुरू आहे. जागा वाटपाची ही चर्चा पूर्ण झाल्यावर सोमवारी आम्ही उमेदवारांची यादी जाहीर करू, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले.