पनवेलमध्ये भाजपचे वर्चस्व; शिंदेसेना अन् मविआचा अस्तित्वासाठी संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:05 IST2025-12-23T10:05:43+5:302025-12-23T10:05:58+5:30
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडे नाही प्रमुख नेता; सव्वालाख मतदार वाढले, फायदा कोणत्या पक्षाला? कोणाचे गणित बिघडणार

पनवेलमध्ये भाजपचे वर्चस्व; शिंदेसेना अन् मविआचा अस्तित्वासाठी संघर्ष
-वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : स्थापनेनंतर पनवेल महापालिकेत पहिल्या निवडणुकीपासून भाजपचे वर्चस्व आहे. या खेपेला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आ. विवेक पाटील हे कर्नाळा बँक घोटाळ्यात जेलमध्ये असून दुसरे नेते जे.एम. म्हात्रे हे भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे पक्षाचा प्रमुख नेत्यासाठीचा शोध सुरू आहे. तर शिंदेसेना, उद्धवसेना हे एकसंघ असल्यापासून व काँग्रेस व राष्ट्रवादीला अस्तित्वासाठी कायम झगडावे लागले.
सिडकोने विकसित केलेल्या शहरात महापालिकेच्या स्थापनेनंतर हक्काची स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाली. पहिल्या महापौर म्हणून डॉ. कविता चौतमोल यांना संधी मिळाली. आरक्षणामुळे मागासवर्गीय महिलेच्या हाती सूत्रे दिली. नंतरच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतरही चौतमोल यांनाच आरक्षण बदलूनही कायम केले.
सत्ताधारी राजवट संपल्यावर तत्कालीन आयुक्त गणेश देशमुखनंतर सध्या मंगेश चितळे प्रशासक म्हणून काम पाहात आहेत.
कोणते मुद्दे निर्णायक?
पनवेल पालिका हद्दीत खारघर, कामोठे, कळंबोली, रोडपाली आणि तळोजामधील प्रदूषण, वाढीव मालमत्ता कर, अनियमित पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील समस्या हे मुद्दे निर्णायक ठरतील.
महापालिकेची स्थापना भाजप आ. प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने झाली. पहिल्याच २०१७ सालच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. नंतरच्या काळात शेकापच्या १० नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
भाजप ५१
शिवसेना २३
राष्ट्रवादी २
काँग्रेस २
विकसित होणाऱ्या शहरांत पनवेल अग्रस्थानी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील महापालिका असलेल्या शहरात अनेक महत्त्वाकांशी प्रकल्प आहेत. झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांत पनवेल अग्रस्थानी आहे. त्यामुळे या शहराच्या महापालिकेवर कोणाची सत्ता येते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.