...तोपर्यंत महावितरण कार्यालयासमोरचं बसून राहणार; दौंडमधील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 21:15 IST2022-03-08T21:15:06+5:302022-03-08T21:15:23+5:30
संपूर्ण दौंड तालुका परीसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज बिलाच्या वसुलीपोटी गेल्या सात दिवसांपासून ट्रांसफार्मर बंद करुन ठेवला आहे

...तोपर्यंत महावितरण कार्यालयासमोरचं बसून राहणार; दौंडमधील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
पाटेठाण : संपूर्ण दौंड तालुका परीसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वीज बिलाच्या वसुलीपोटी गेल्या सात दिवसांपासून ट्रांसफार्मर बंद करुन ठेवला आहे. विद्युत पुरवठा खंडित केल्याने जनावरांना तसेच पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाण्याचा संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. शेतातील हिरवीगार पिके देखील पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. वीज पंप बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आता अनावर झाला असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकण्याचा तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पिंपळगाव महावितरण कार्यालयासमोर बसून राहणार शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा विविध शेतकरी संघटना,शेतकरी कृती समिती,रयत शेतकरी संघटना यांनी घेतला आहे.
दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक ठिकाणी वीज बिल वसुलीसाठी महावितरणने संपूर्ण ट्रान्सफार्मरच बंद करुन कारवाईचा अजब बडगा उगारला आहे. दर दोन तीन महिन्याच्या कालावधीत वीज बिलांचे वाटप झाल्यानंतर महावितरण वसुलीसाठी कारवाई तंत्राचा वापर करत आहे. मागील सरकारच्या कालावधीत वीज बिले शेतकऱ्यांना न आल्याने तसेच चालू सरकारने देखील वीज बिल माफीचे आश्वासन दिले होते. परिणामी शेतकऱ्यांनी वीज बिले न भरल्याने सद्यस्थितीमध्ये अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात आले असल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक मेटाकुटीला आला आहे.