"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:49 IST2026-01-15T15:47:41+5:302026-01-15T15:49:18+5:30
Supriya Sule Municipal Election Maharashtra 2026: राज्यात २९ महापालिकांसाठी मतदान होत असताना घडलेल्या काही प्रकारांवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओ, फोटो शेअर करत प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली आहे.

"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
Supriya Sule on Municipal voting 2026 : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान पार पडत असताना काही प्रकार घडले. ते अधोरेखित करत विरोधी पक्षाकडून प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका उपस्थित केल्या. आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करत काही मुद्दे मांडले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत असून, मतदार यादीत नाव नसल्याचे, बोटावरील शाई पुसली जात असल्याचे, तसेच ईव्हीएम बंद पडल्याचेही प्रकार घडले. या प्रकाराबद्दल खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रिया आज पार पडत असताना माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या अतिशय धक्कादायक व चिंताजनक आहेत. अनेक मतदान केंद्रांवर EVM बाबत गंभीर घोळ समोर येत आहेत. अनेक ठिकाणी मतदान केल्यानंतर कोणाला मत गेले याचा लाईट लागत नाही, सर्व मते दिल्यानंतर 'बीप' आवाज येत नाही."
बोगस मतदानासाठी तर नाही...
"अनेक ठिकाणी तर मतदानानंतर बोटावरील शाई पुसण्यासाठी लोक उभे केले जात आहेत; हे बोगस मतदानासाठी तर नाही ना, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे", असा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी मांडला आहे.
संपूर्ण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
"मतदान केंद्रे व अनुक्रमांक यामध्ये अद्यापही घोळ आहेत, काही EVM वर उमेदवारांची नावे चुकल्याचे आढळून आले आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर उघडपणे पैशांचे वाटप होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. या सर्व गंभीर प्रकारांमुळे मतदारांमध्ये गोंधळ व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून ही संपूर्ण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सशक्त लोकशाहीसाठी मतदान प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह असणे आवश्यक आहे, मात्र सध्या तसे होताना दिसत नाही, हे खेदाने नमूद करावे लागते", असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली आहे.
राज ठाकरे निवडणूक आयोगाबद्दल काय म्हणाले?
मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "सरकार आणि निवडणूक प्रशासन हे निवडणुका जिंकण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटत आहेत. मतदानानंतर शाईऐवजी पेन वापरले जात आहेत. ज्याची शाई सहज पुसली जात आहे. लोक बाहेर येतात. शाही पुसतात आणि पुन्हा मतदान करत आहेत, यालाच विकास म्हणतात का", असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.
"सध्याची सिस्टीम ही केवळ विरोधकांना संपवण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांना जिंकवण्यासाठी काम करत आहे. दुबार मतदारांचा विषय आम्ही लावून धरला, तेव्हा प्रशासनाने आधी तो नाकारला. आता स्वतः दुबार मतदारांची यादी जाहीर केली. हा संपूर्ण घोटाळा आहे", असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.