निवडणूक आयोगाच्या पथकाने पकडली रोकड, पुण्यातील तिसरी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 05:10 IST2019-10-06T05:09:30+5:302019-10-06T05:10:03+5:30

पुण्यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून रोकड जप्त करण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या आहेत.

Third action in Pune, held by Election Commission's team | निवडणूक आयोगाच्या पथकाने पकडली रोकड, पुण्यातील तिसरी कारवाई

निवडणूक आयोगाच्या पथकाने पकडली रोकड, पुण्यातील तिसरी कारवाई

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यातील पर्वती मतदार संघात चार स्थिर आणि चार भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यातील स्थिर पथक-१ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बाराच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान २ लाख  ३७ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली. रोकड जप्त करण्यात आल्याची  पुण्यातील ही तिसरी घटना असून तीनही कारवाया पर्वती मतदार संघातच करण्यात आल्या आहेत. 

पथक प्रमुख सचिन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थिर पथक-१ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सॅलिसबरी पार्क येथील पुनावाला गार्डनजवळ नाकाबंदी केली होती. आचार संहितेच्या अनुषंगाने मद्य वा रोकड वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास एक निळ्या रंगाची मर्सिडीज बेंझ संशयास्पदरित्या जाताना दिसली. पथकाचे प्रमुख सचिन पवार, सौरभ कामठे, गणेश सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी मुल्ला, शिंदे व धोत्रे तसेच भरारी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक जू पवार व कुंटेवाढ  यांनी ही मोटार अडविली. 
मोटारीची तपासणी करीत असताना डिकीमध्ये २ लाख ३७ हजार ५०० रुपयांची रोकड मिळून आली. ही रक्कम वडगाव शेरी येथे राहणाऱ्या सलून व्यावसायिकाची असून ती जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम स्वारगेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. 

पुण्यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून रोकड जप्त करण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात १ ऑक्टोबर रोजी स्थिर पथक क्रमांक एकने कारवाई करीत महर्षीनगर येथे मध्यरात्री २ लाख ७२ हजार ३५० रुपयांची रोकड जप्त केली होती. तर शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी स्थिर पथक क्रमांक दोनने अरण्येश्वर येथील संतनगर येथे नाकाबंदी दरम्यान ११ लाख १ हजार २६० रुपयांची रोकड जप्त केली होती. या तीनही कारवाया पर्वती विधानसभा मतदार संघात करण्यात आल्या आहेत.

Web Title: Third action in Pune, held by Election Commission's team