मानाचा पहिला कसबा गणपतीला बालन दाम्पत्याच्या हस्ते चांदीची मूर्ती अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:44 IST2023-09-25T11:43:51+5:302023-09-25T11:44:21+5:30
मानाच्या गणपतीची सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य - पुनीत बालन

मानाचा पहिला कसबा गणपतीला बालन दाम्पत्याच्या हस्ते चांदीची मूर्ती अर्पण
पुणे: मानाचा पहिला गणपती श्री. कसबा गणपतीसाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी चांदीची मूर्ती भेट दिली. पुनीत बालन व जान्हवी धारीवाल-बालन यांनी शनिवारी विधिवत पूजा करून बाप्पाची चांदीची मूर्ती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्याकडे सुपुर्द केली.
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असल्यामुळे संपूर्ण गणेशोत्सवात कसबा गणपतीला भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात. या मंदिरात गणपती बाप्पाची चांदीची मूर्ती अधिक शोभून दिसेल, या विचाराने आणि गणपती बाप्पावर असलेल्या श्रद्धेतून ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळा’चे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी बाप्पाची चांदीची मूर्ती भेट दिली. विधिवत पूजा करून ती मंदिराकडे अर्पण केली.
यावेळी कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्यासह इतर विश्वस्त, भाविक आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या माध्यमातून मानाच्या गणपतीची सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया पुनीत बालन यांनी दिली.