मंगलमयी सूर अन् चैतन्यमय वातावरणात रंगलेला उत्सव अंतिम टप्प्यात; भव्य रथांमधून बाप्पाला वाजतगाजत शनिवारी निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:26 IST2025-09-05T12:26:21+5:302025-09-05T12:26:32+5:30

‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या पाच गणपतींसह प्रतिष्ठित ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक आकर्षक रथातून काढण्यात येणार

The festival, which was celebrated with auspicious tunes and a vibrant atmosphere, is in its final phase; Bappa is bid farewell on Saturday with grand chariots ringing out. | मंगलमयी सूर अन् चैतन्यमय वातावरणात रंगलेला उत्सव अंतिम टप्प्यात; भव्य रथांमधून बाप्पाला वाजतगाजत शनिवारी निरोप

मंगलमयी सूर अन् चैतन्यमय वातावरणात रंगलेला उत्सव अंतिम टप्प्यात; भव्य रथांमधून बाप्पाला वाजतगाजत शनिवारी निरोप

पुणे : मंगलमयी सूर अन् चैतन्यमय वातावरणात रंगलेला दहा दिवसांचा गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे लाडक्या बाप्पांना मोठ्या भक्तिभावाने आणि थाटात निरोप देण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी (दि. ६) ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या पाच गणपतींसह प्रतिष्ठित ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक आकर्षक रथातून काढण्यात येणार आहे. मंडळांचे विसर्जन मिरवणुकीसाठीचे नियोजन पूर्ण झाले असून, रथाला सजविण्याचे काम मंडळांकडून सुरू झाले आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९:३० वाजता सुरुवात होणार असून, दरवर्षी लांबणारी मिरवणूक यंदा लवकर संपविण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे. त्यात पोलिसांना यश येते का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या वर्षी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच विसर्जन मिरवणुकीवरून वादाला तोंड फुटले होते. काही मंडळांनी मानाच्या गणपतींनंतर येण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, काही मंडळांनी त्याला विरोध दर्शवीत सकाळी ७ वाजता मिरवणूक काढण्याची भूमिका घेतली होती. मात्र पोलिस आयुक्तांनी मध्यस्थी करीत त्यावर मंडळांशी बोलून तोडगा काढला. त्यामुळे मंडळांनी पूर्वीप्रमाणेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यातच पुणे पोलिसांनी दरवर्षी लांबणारी मिरवणूक यंदा वेळेत संपविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे दरवर्षी १०:३० वाजता बेलबाग चौक येथून सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळेत बदल करून ९:३० वाजता मिरवणुकीला सुरुवात केली जाणार आहे.

श्री कसबा गणपती मंडळ

श्री कसबा गणपती मंडळाच्या ‘श्रीं’ ची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सकाळी साडेनऊ वाजता पालखीतून निघणार असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलधीर मोहोळ यांची उपस्थिती असणार आहे. दोन ढोल-ताशा पथकांचा सहभाग, गणेशोत्सवाची माहिती देणारा विशेष रथ यांसह विविध सामाजिक संस्थांचा मिरवणुकीमध्ये सहभाग असणार आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ

मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची मिरवणूक दर वर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने पालखीतून निघणार असून, अब्दागिरी, मानचिन्हासह श्री गणराय विराजमान असलेली चांदीची पालखी कार्यकर्ते स्वत: आपल्या खांद्यावरून वाहून मिरवणुकीत सहभागी होतील. नगरावादन आणि ढोल-ताशा पथकांचे वादन होईल.

गुरुजी तालीम गणपती मंडळ

मानाचा तिसरा गुरुजी तालीमचा गणपती सकाळी साडेनऊ वाजता ‘हर हर महादेव’ या फुलांनी सजविलेल्या रथावर विराजमान होणार आहे. स्वप्नील सरपाले, सुभाष सरपाले यांनी हा रथ साकारला आहेत. नगारा वादन आणि ढोल-ताशा पथकांचे वादन होईल.

तुळशीबाग महागणपतीची मयूर रथातून सांगता मिरवणूक

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या १२५ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता वैभवशाली सांगता मिरवणुकीने होणार आहे. तुळशीबाग महागणपतीची मिरवणूक मयूर रथातून निघणार आहे. मयूर रथावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून या रथामध्ये हायड्रोलिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे. रथाची उंची ३५ फूट इतकी असून हा रथ १६ फूट रुंद आणि २४ फूट लांब असणार आहे. मंडळाच्या १२५ व्या वर्षानिमित्त महिला व परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधू यांचा नगारा असून, ढोल-ताशा पथकेदेखील सहभागी होणार आहेत.

‘कथकली मुखवट्याच्या’ रथात केसरीवाडा गणपती

मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला उद्या (शनिवारी) सकाळी ९:३० वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होणार आहे. मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकांचा समावेश असणार आहे. बिडवे बंधूंचे नगारा वादन, इतिहासप्रेमी मंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज समाधी जीर्णोद्धार हा देखावा असणार आहे. ‘कथकली मुखवट्याच्या’ रथात प्रथेप्रमाणे गणराय पालखीत विराजमान असतील. विसर्जन मिरवणुकीत केसरीवाडा गणेशोत्सव प्रमुख डॉ. रोहित टिळक, ‘केसरी’च्या विश्वस्त-व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, विश्वस्त डॉ. प्रणीत रोहित टिळक, रौनक रोहित टिळक तसेच ‘केसरी’चे अधिकारी, कर्मचारी असतील. ‘हरवलेला पोस्टमन’ ही स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकाची संकल्पना असणार आहे.

‘श्री गणेश सुवर्णयान’ रथ साकार

अखिल मंडई मंडळाची सांगता मिरवणूक सायंकाळी ६ वाजता निघणार आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ‘श्री गणेश सुवर्णयान’ हा रथ साकारण्यात आला आहे. मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे. श्री गणेश सुवर्णयानाचे स्वरूप जहाजासारखे असून, रथाचा आकार २५ फूट लांब आणि १६ फूट रुंद असा असणार आहे. रथावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. जहाजाच्या वर सर्च लाइट असतील. तसेच आकर्षक कंदील लावण्यात येणार आहेत. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन त्यामागे गंधर्व बॅण्ड तसेच शिवगर्जना पथकाचे वादन मिरवणुकीत होणार आहे. कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर यांनी रथ साकारला आहे.

श्री गणनायक रथातून निघणार ‘दगडूशेठ’ची सांगता मिरवणूक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा श्री गणनायक रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून, आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. सलग तिसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. यंदाची प्रतिकृती असलेल्या केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय शैलीतील रथाची निर्मिती करण्यात आली आहे. दक्षिण भारतात जसा लाकडाचा रथ साकारला जातो, तसा हा रथ तयार करण्यात आला आहे. रथावर ज्याप्रमाणे सप्तरंगांची उधळण केली जाते, तशीच इथेही करण्यात आली आहे. श्री पद्मनाभ स्वामी हे श्री विष्णूंचे मंदिर असल्यामुळे रथावर ४ गरुडमूर्ती लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ मूर्ती ६ फूट उंचीच्या तर २ मूर्ती ३ फूट उंचीच्या आहेत. रथाचा आकार १६ बाय १६ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर झुंबरे, एलईडी व पार लाइटचे फोकस लावण्यात येणार आहेत. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी हा रथ साकारला आहे, मिरवणुकीत मानवसेवा रथ व त्यामध्ये सनई-चौघडा अग्रभागी असणार आहे. मिरवणुकीत स्वरूपवर्धिनीचे पथक, केरळचे चेंदा मेलम पथक असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Web Title: The festival, which was celebrated with auspicious tunes and a vibrant atmosphere, is in its final phase; Bappa is bid farewell on Saturday with grand chariots ringing out.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.