Pune Ganpati Festival: मानाच्या ‘श्रीं’ ची प्राणप्रतिष्ठापना मुहूर्तावर होणार; पुण्यनगरी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:13 IST2025-08-26T17:11:59+5:302025-08-26T17:13:01+5:30

पासष्ट कलांचा अधिपती असलेल्या ‘श्रीं’ची मूर्ती फुलांनी सजलेल्या आणि विद्युत रोषणाईने नटलेल्या आकर्षक मंडपात विराजमान होणार

The cremation of the respected manache ganapti will take place on the auspicious day Pune is ready to welcome Ganpati Bappa | Pune Ganpati Festival: मानाच्या ‘श्रीं’ ची प्राणप्रतिष्ठापना मुहूर्तावर होणार; पुण्यनगरी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज

Pune Ganpati Festival: मानाच्या ‘श्रीं’ ची प्राणप्रतिष्ठापना मुहूर्तावर होणार; पुण्यनगरी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज

पुणे : सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या विघ्नहर्ता श्री गणरायाचे बुधवारी ( दि. २७) ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जल्लोषात पुण्यनगरीमध्ये दिमाखात आगमन होत आहे. ‘श्रीं’च्या आगमनासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पुण्यातील मानाच्या गणपतींची मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पासष्ट कलांचा अधिपती असलेल्या ‘श्रीं’ची मूर्ती फुलांनी सजलेल्या आणि विद्युत रोषणाईने नटलेल्या आकर्षक मंडपात विराजमान होणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आल्याने भाविकांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उद्यापासून (दि. २७) गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. जगभरात नावलौकिक मिळवलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून दहा दिवसांमध्ये भाविक पुण्यात येतात. कालपरत्वे गणेशोत्सवामध्ये बदल झाला असला तरी मानाच्या गणपतींसह पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई या प्रतिष्ठित गणपतींचे महत्त्व आजही तितकेच आहे.

मानाचा पहिला-कसबा गणपती

पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना दुपारी ११ वाजून ४० मिनिटांनी स्वामी सवितानंद यांच्या हस्ते होणार आहे. दरवर्षीप्रमाणे ‘श्रीं’ची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये विराजमान होणार आहे. अभिजित धोंडफळे यांनी ही मूर्ती साकारली असून, रास्ता पेठ, केईएम रुग्णालय, अपोलो टॉकीज आणि फडके हौद चौक असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. या मिरवणुकीत संघर्ष, अभेद्य आणि श्रीराम ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहे.

मानाचा दुसरा- तांबडी जोगेश्वरी

श्री तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवत म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरे स्थान आहे. मंडळाचे हे १३३ वे वर्ष आहे. श्रींच्या आगमनाची मिरवणूक सकाळी १० वाजता केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून निघेल, कुटे चौक, मगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौकमार्गे ती उत्सव मंडपात पोहोचेल. आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅण्ड, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल पथक, विष्णुनाद शंख पथक सेवा देतील, तर चांदीच्या पालखीत ‘श्रीं’ची दुपारी १२.११ वाजता सनई-चौघड्याच्या निनादात श्रींची प्राणप्रतिष्ठापना वासुदेव निवास आश्रम, पुणे या महायोग शक्तिपीठाचे प्रधान विश्वस्त प. पू. योगश्री शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या वर्षी श्रींसाठी साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिली कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

मानाचा तिसरा -गुरुजी तालीम

पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे यंदाचे १३९ वे वर्ष आहे. ‘श्रीं’ची आगमन मिरवणूक सकाळी ११ वाजता गुरुजी तालीम गणपती मंदिर, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, गणपती चौक, गुरुजी तालीम गणपती चौक उत्सव मंडप मार्गे निघणार आहे. स्वप्नील सरपाले व सुभाष सरपाले यांनी बनवलेल्या फुलांच्या आकर्षक रथातून श्रींची मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बॅण्ड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक, राघमंत्र ढोल-ताशा पथक, विघ्नहर्ता ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहेत. श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी २ वा. ३५ मिनिटांनी उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या वर्षी नगरचे सजावटकार शुंभकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण फायबर ग्लासमध्ये बनवलेल्या बारा ज्योतिर्लिंगांमधील एक सर्वात पवित्र असे ज्योतिर्लिंग वाराणसी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिर साकारले आहे.

मानाचा चौथा - तुळशीबाग

सांस्कृतिक पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी सन २०२५ साली शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. १३० वर्षांहून अधिक गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा आपल्या पुण्यनगरीस लाभलेली आहे. श्रींची प्राणप्रतिष्ठापना योगी निरंजन नाथ महाराज प्रमुख विश्वस्त आळंदी देवाची यांच्या हस्ते दु.१२ वाजून १५ मिनिटांनी होणार आहे. उत्सव काळात अभिषेक, गणेश याग, ब्रह्मणस्पती याग, सत्यविनायक पूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

मानाचा पाचवा- केसरीवाडा

गणपती उत्सवाला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सार्वजनिक स्वरूप देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरीवाडा गणपतीला विशेष महत्त्व आहे. पुण्यातील इतर मंडळांसह केसरीवाडा गणपतीला पाचवे मानाचे स्थान आहे. केसरीवाडाच्या श्रीं मिरवणुकीला सकाळी ९ वाजता रमणबाग चौकातून सुरुवात होणार आहे. परंपरेनुसार मानाच्या पालखीत बाप्पा विराजमान असतील. सकाळी १० वाजता रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. ११ वाजता गणरायाची महाआरती होईल. यावेळी केसरी गणेशोत्सवाचे प्रमुख डॉ. रोहित टिळक उपस्थित असतील. त्यानंतर श्रीराम आणि शिवमुद्रा या ढोल-ताशा पथकांचे टिळकवाड्यात स्थिर वादन होईल. तसेच बिडवे बंधू यांचे सनई-चौघडा वादनही होणार आहे.

अखिल मंडई मंडळ

फुलांनी सजलेल्या भव्य मयूर रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक सकाळी १० वाजता निघणार आहे . ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन नवीनचंद्र विप्रदास मेनकर व स्नेहल नवीनचंद्र मेनकर यांच्या हस्ते होणार आहे. अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३२वे वर्ष आहे. अखिल मंडई मंडळ, मंडई पोलिस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक, गोटीराम भैया चौक येथून उत्सव मंडपमार्गे मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅण्ड पथक तसेच मल्हार ढोल-ताशा पथक सांगवी, स्वराज्य पथक काळभोर नगर चिंचवड, समर्थ पथक वादन करतील. यंदाच्या गणेशोत्सवात ‘कृष्णकुंज’ ही आकर्षक सजावट साकारण्यात येणार आहे. यावर्षी हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती विराजमान होणार आहेत.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

यंदाच्या गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. मध्य प्रदेश चित्रकूट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांची सजावट आणि रथावर भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती लावण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बॅण्ड, प्रभात बॅण्ड, मयूर बॅण्ड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे.

Web Title: The cremation of the respected manache ganapti will take place on the auspicious day Pune is ready to welcome Ganpati Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.