विशेष तपासणी मोहिम! अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास 'या' टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 20:49 IST2025-08-29T20:49:34+5:302025-08-29T20:49:51+5:30
सणासुदीच्या दिवसांत विक्रीस येणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे

विशेष तपासणी मोहिम! अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास 'या' टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा
पुणे: गणेशोत्सवात नागरिकांना स्वच्छ व गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने विशेष तपासणी मोहिम हाती घेतली आहे. सणासुदीच्या काळात विक्रीस येणाऱ्या अन्नपदार्थामध्ये भेसळीबाबत काही संशय आढळल्यास नागरिकांनी तत्काळ १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात दि.११ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या तपासणी मोहिमेत आतापर्यंत ३५ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून ६२ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. यात प्रसादासाठी लागणारे कच्चे अन्नपदार्थ, मिठाई आदींचा समावेश आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच दोषी आस्थापनांवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली.
सणासुदीच्या दिवसांत विक्रीस येणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. पुणे कार्यालयातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून, आयुक्त अन्न व औषध प्रशासन, मुंबई तसेच सह आयुक्त (पुणे विभाग) यांच्या देखरेखीखाली तपासण्या सुरू आहेत.
प्रसाद वाटपात स्वच्छतेची खबरदारी घेण्याचे गणेश मंडळांना आवाहन
गणेशोत्सवात भाविकांना दिला जाणारा प्रसाद सुरक्षित व स्वच्छ असावा यासाठी गणेश मंडळांनी काटेकोर काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सु. ग. अन्नपुरे यांनी केले आहे. प्रसाद काचेच्या किंवा फूड ग्रेड डब्यात झाकून ठेवावा, शिळे अन्न देऊ नये, प्रसाद वाटणाऱ्या व्यक्तीने हात स्वच्छ धुवावेत, स्वच्छ कपडे, हातमोजे, मास्क व टोपी वापरावी. संसर्गजन्य आजार असलेल्यांनी प्रसाद हाताळू नये. पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करूनच वापरावे, भांडी स्वच्छ धुवून कोरडी ठेवावीत. परिसर स्वच्छ राहावा यासाठी झाकण असलेली कचरा कुंडी ठेवावी. प्रसाद तयार करणाऱ्या सर्व मंडळांनी foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर १०० रुपयांची फी भरून अनिवार्य नोंदणी करून प्रमाणपत्र घ्यावे व परवानाधारक दुकानातूनच कच्चा माल खरेदी करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.