PMC Election 2026: एबी फॉर्म खाणाऱ्या शिंदेसेनेच्या कांबळेंची निवडणुकीतून माघार; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:37 IST2026-01-02T16:35:45+5:302026-01-02T16:37:32+5:30
शिंदेसेनेतील नेत्यांच्या सूचनेनुसार अखेर कांबळे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे

PMC Election 2026: एबी फॉर्म खाणाऱ्या शिंदेसेनेच्या कांबळेंची निवडणुकीतून माघार; नेमकं कारण काय?
पुणे : पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये उमेदवारीवरून झालेल्या गोंधळात शिवसेनेचे उद्धव कांबळे यांनी उमेदवार मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म फाडून थेट गिळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर उद्धव कांबळे यांना पोलिसांनी नोटीस बजावली. कांबळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना फॉर्म खाल्ला नसल्याचे सांगितले होते. आता कांबळे यांच्याबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे समजते आहे.
एकाच प्रभागात दोन उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आल्याने प्रचंड गोंधळ उडाला. या गोंधळात शिवसेनेचे उद्धव कांबळे यांनी उमेदवार मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म फाडून थेट गिळून टाकल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था भंग केल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांना पोलिसांनी नोटीस बजावली. त्यामुळे कांबळे यांनी शिंदेसेनेतील नेत्यांच्या सूचनेनुसार अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता प्रभाग क्रमांक ३६ मधून मच्छिंद्र ढवळे हे अधिकृत उमेदवार झाले आहेत. ते शिवसेनेकडून निवडणूक लढणार आहेत. कांबळे यांनी माघार घेतल्याने ढवळे यांना शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे.
काय म्हणाले होते कांबळे?
सगळीकडे बातम्या आल्या होत्या की, मी फॉर्म खाल्ला आहे, किंवा गिळून टाकला आहे. पण मी तसं काहीच केलं नाही, मला तेवढं कळतं. मी फॉर्म भरायला गेल्यावर मला कळलं की, तिथे अर्जाची छाननी सुरू आहे. आणि मच्छिंद्र ढवळे यांनी आमच्या पक्षाकडून फॉर्म भरल्याचं समजले. मी त्यांना व्यक्तीश: ओळखत नाही. त्यांचा पक्षाशी कोणताही काही संबंधही नाही, त्यांनी कुठून तरी फॉर्म मिळवला आणि सबमीट केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मीच अधिकृत उमदेवार असल्याचे सांगितले आहे. तसं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. मी कार्यालयात पोहोचल्यावर मला कळलं कि, दुसरा कुणीतरी उमेदवार फॉर्म भरत आहे. तेव्हा भावनेच्या भरात तो माझ्याकडून फाटला गेला. मी ते १०० टक्के मान्य करतो की, माझी चुक झाली आहे. पण प्रभाग क्रमांक ३६ मध्ये मी अनेक वर्षांपासून काम करतोय. मी एकनिष्ठ आहे. ढवळे यांना मी किंवा शिवसेनेचे कोणतेच पदाधिकारी ओळखत नाहीत. त्यांनी तो फॉर्म कुठून मिळवला, हेही आम्हाला माहीत नाही, असंही कांबळे यांनी सांगितलं होतं.