quarrel in Gram Panchayat elections in Pune district; Activists of two groups clashed in Kusegaon | पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुक मतदान प्रक्रियेला गालबोट; दोन गटाचे कार्यकर्ते भिडले 

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुक मतदान प्रक्रियेला गालबोट; दोन गटाचे कार्यकर्ते भिडले 

पुणे : कोरोनामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यात आमदार,  स्थानिक नेत्यांच्या पुढाकारामुळे ९५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. आज पुणे जिल्ह्यात ६४९ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. मात्र याच दरम्यान निवडणूक प्रक्रियेदरम्यान दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागले. 

पुणे जिल्ह्यातील ६४९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. यात दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे सकाळपासून सुरु मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु होती. मात्र याचदरम्यान गावातील दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर वादात झाल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले व एकमेकांना भिडले. काही वेळातच दोन गटात तुफान हाणामारीला सुरुवात देखील झाली. मात्र वातावरणाचा अंदाज घेत व कायदा व सुव्यवस्था अडचणीत येऊ नये म्हणून आक्रमक पवित्रा धारण केला. तसेच परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गर्दीवर सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. मात्र काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली. हे सर्व प्रकरण मिटल्यानंतर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरु झाली. 

गेल्या एक महिन्यांपासून रणधुमाळी सुरू असलेल्या जिल्ह्यात 649 ग्रामपंचायतीसाठी तब्बल 11 हजार 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून,  सर्वांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गावकी-भावकीचे राजकारण तापलेले असते. अशा परिस्थितीत मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यात 5 हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: quarrel in Gram Panchayat elections in Pune district; Activists of two groups clashed in Kusegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.