प्रारूप मतदार यादीतील चुकांची दुरूस्ती स्वताहुन करावी;आयोगाचे महापालिकांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:22 IST2025-11-25T19:22:14+5:302025-11-25T19:22:34+5:30
- चुकांची दुरूस्ती करण्याकरीता कोणत्याही हरकतीची आवश्यकता नाही

प्रारूप मतदार यादीतील चुकांची दुरूस्ती स्वताहुन करावी;आयोगाचे महापालिकांना आदेश
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. अनेक महापालिकामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे त्यात कोणत्याही चुका राहिल्याची बाब पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या चुकांची दुरुस्ती अंतिम मतदार यादी तयार करताना स्वत:हुन करावी. या चुकांची दुरूस्ती करण्याकरीता कोणत्याही हरकती प्राप्त होण्याची आवश्यकता नाही. केवळ बी.एल.ओ. अथवा तत्वम कर्मचाऱ्यांनी केलेल्या अहवालावर विसंबून न रहाता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची खातरजमा करून मतदार यादी सुधारीत करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहेत.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक ठिकाणी भौागोलिक हद्दीला हरताळ फासण्यात आला आहे. अनेक प्रभागांच्या भौागोलिक हद्दीमध्ये नसलेले शेकडो मतदार मतदार प्रारूप यादीत टाकले आहेत. त्यामुळे मतदार यादीतील घोळामुळे मतदारांची पळावापळवी झाल्याचा आरोप इच्छुकांनी केला आहे. हक्काचा मतदार अन्य प्रभागांत गेल्याने इच्छुक धास्तावले आहेत. त्याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी तक्रारी केल्या आहेत. त्यावर राज्य निवडणुक आयोगाने याबाबत आज आदेश दिले आहेत. त्यात विधानसभा मतदार यादीचे पालिकेच्या संबंधित प्रभागात योग्य प्रकारे विभाजन करणे ही संबंधित पालिका आयुक्त यांची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केल्यानंतर जर त्यात लेखनीकांच्या चुका, , दुस०या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले, १ जुलै, २०२५ च्या विधानसभा मतदार यादीत नावे असूनही संबंधित प्रभागात गाव समाविष्ट झाली नाहीत, अशा बाबी स्वाहून निदर्शनास आल्यास अथवा अन्य मार्गाने निदर्शनास आणण्यात आल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन अंतिम मतदार यादी तयार करताना त्या चुकांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. काही पालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे आल्या आहेत. पालिकेकडे देखील अशा तक्रारी येऊ शकतात. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित मतदार योग्य प्रभागात समाविष्ट झाले आहेत किंवा कसे याची तपासणी करण्यात यावी आणि जर असे मतदार चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाले असतील तर त्या मतदारांना योग्य प्रभागात समाविष्ट करुन अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात याव्यात.
केवळ बी.एल.ओ. अथवा तत्वम कर्मचा ऱ्यांनी केलेल्या अहवालावर विसंबून न रहाता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची खातरजमा करून मतदार यादी सुधारीत करण्याची कार्यवाही करावी. रोज प्राप्त होणाऱ्या हरकतींची तात्काळ तपासणी करुन शक्यतो त्याच अथवा दुसऱ्याच दिवशी त्याचा निपटारा होईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शेवटच्या दिवशी ताण येणार नाही असे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे सचिव सुरेश काकणी यांनी दिले आहेत.
आयुक्त नवल किशोर राम घेणार प्रारूप मतदार यादीचा आढावा
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीचा आयुक्त नवल किशोर राम हे उदया सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्ताबरोबर बैठक घेणार आहेत. त्यात प्रारूप मतदार यादीचा आढावा घेतला जाणार आहे.