कसब्यातील भुयारी मार्गाच्या ‘डीपीआर’ निर्मितीला हिरवा कंदील;सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची प्रशासनाला सूचना

By राजू हिंगे | Updated: March 20, 2025 19:22 IST2025-03-20T19:20:49+5:302025-03-20T19:22:40+5:30

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची प्रशासनाला सूचना

pune news Green light given to preparation of DPR for subway in Kasba | कसब्यातील भुयारी मार्गाच्या ‘डीपीआर’ निर्मितीला हिरवा कंदील;सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची प्रशासनाला सूचना

कसब्यातील भुयारी मार्गाच्या ‘डीपीआर’ निर्मितीला हिरवा कंदील;सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची प्रशासनाला सूचना

पुणे :पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गांच्या प्रकल्पांना गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली.

शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या कसबा मतदारसंघात प्रमुख बाजारपेठा तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू असल्याने दररोज हजारो नागरिक या भागामध्ये येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र कायम पाहायला मिळते. या भुयारी मार्गांच्या माध्यमातून वाहतुकीला गती मिळाल्याने वेळ आणि इंधनाची बचत होईल. त्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, सदाशिव साळुंखे, उपसचिव प्रज्ञा वाळके, बी. एस. तेलंग, अवर सचिव प्रभाकर लहाने, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, खासगी सचिव सुधाकर भोसले आदी उपस्थित होते.

आमदार हेमंत रासने म्हणाले, ‘दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे या भागात उड्डाणपुलाचा पर्याय शक्य नसल्याने आम्ही भुयारी मार्गांची संकल्पना पुढे आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याबद्दलचे सविस्तर निवेदन देण्यात आले होते. आज झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याची सूचना प्रशासनाला केल्याने भुयारी मार्ग निर्मितीला गती मिळणार आहे.’

Web Title: pune news Green light given to preparation of DPR for subway in Kasba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.