पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३२ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:11 IST2025-12-02T16:10:25+5:302025-12-02T16:11:06+5:30
या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशाराही 'आप'ने दिला आहे.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३२ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
धायरी: पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, लाखो नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. ही पाणीटंचाई नैसर्गिक नसून, टँकर लॉबीला पोसण्याचे षङ्यंत्र प्रशासन आणि त्यांचे दलाल करत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशाराही 'आप'ने दिला आहे.
याबाबत आम आदमी पक्षाच्यावतीने महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले आहे. 'आप'ने निवेदनात नमूद केले आहे की, समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने टँकरसाठी ४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या टँकर कामाचा ठेका तात्काळ बंद करण्यात यावा. ठेकेदाराने टँकरने केलेल्या पाणीपुरवठ्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी धनंजय बेनकर, किरण कद्रे, सुनील सौदी, निरंजन अडागळे, निखिल खंदारे, कृष्णा कपूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- बेकायदेशीर नळ कनेक्शन: धायरी, शिवणे, नऱ्हे आंबेगाव, लोहगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर नळ कनेक्शन आहेत.
- राजकीय संगनमत: तत्कालीन राजकीय नगरसेवक आणि अधिकारी यांनी पैसे घेऊन दिलेली बेकायदा पाणी कनेक्शनही मोठ्या प्रमाणावर आहेत
- परिणाम: यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे.
- वास्तव: दाट लोकवस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी चार ते पाच दिवसांतून एकदाच पाणी येते, तर निम्म्याहून अधिक भागांना पाणी मिळतही नाही. त्यामुळे या भागांत वर्षभर पाणीटंचाईची समस्या कायम राहते