PMC Election Results 2026 : महापालिका निवडणुकीतील यशाच्या जोरावर जिल्ह्यात भाजपकडून स्वबळाची चाचपणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:51 IST2026-01-17T19:48:48+5:302026-01-17T19:51:34+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये किंबहुना बारामतीमध्येही भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत

PMC Election Results 2026 : महापालिका निवडणुकीतील यशाच्या जोरावर जिल्ह्यात भाजपकडून स्वबळाची चाचपणी
पुणे: नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. या यशाच्या बळावरच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक स्वबळावर लढवण्याचाबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे विचारमंथन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये भाजपची कमी-जास्तप्रमाणात ताकद आहे. पण त्याला अजून थोडे बळ दिले तर जिल्हा परिषदेमध्ये कमळ फुलण्यापासून कोणी रोखणार नसल्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दरम्यान, शिंदे गटाला बरोबर घ्यायचे की नाही यावर सध्या प्रकर्षणाने चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र आल्याने नाराज झालेल्यांना आपल्या गोटात दाखल करण्यासाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये किंबहुना बारामतीमध्येही भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. परंतु, आतापर्यंत अपेक्षित असे बन दिले न गेल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कमळ फुलले गेले नाही. शिंदेसेनेला बरोबर घेऊन आगामी निवडणुकीत उतरण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, त्यातच महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला घवघवी यश मिळाले. त्यामुळे झेडपी पंचायत समितीची निवडणुकही स्वबळावरच लढवण्याचा एल्गार काही पदाधिकाऱ्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी भाजपची एक महत्वपूर्ण बैठक पार पाडली. या बैठकीला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी निवडणुकीची रणनिती संदर्भात तोव उमेदवार निवडीवरही चर्चा करण्यात आली. यावेळी स्वबळावरच निवडणुक लढवण्याचा विचार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडल्याचे समजते.
स्वबळावर लढायचे ठरवले तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची भीतिही व्यक्त होत असल्याने भाजपची तळ्यात मळ्यात अशी स्थिती आहे. महत्वाचे म्हणजे बारामतीमध्ये कमळ कसे फुलवता येईल यावर भाजपने सध्या विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याचे समजते.
तीन माजी आमदारांना भाजपमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याचे संकेत मिळू लागल्याने तसेच भाजपमधील काही मंडळींना थेट पक्षप्रवेश देण्यात येत असल्याच्या कारणावरून दोन्ही गटातील अनेक नेत्यांसह पदाधिकारी नाराज आहेत. विशेष करून खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांची अजित पवार गटाशी वाढलेल्या सलगीमुळे नाराज आहेत. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार, जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांचीही एकत्रिकरणामुळे धाकधूक वाढली आहे. कारण पडतीच्या काळात पक्षाला ज्यांनी तारले त्यांना विश्वासात न घेताच एकत्रिकरणावर चर्चा होऊ लागल्या आहेत. यामुळे भाजपने यासर्व नाराज मंडळींना हेरून त्यांना पक्षात येण्याची रणनिती आखली असल्याचे समजते. दरम्यान, तिकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेतच पण त्यांना मुहूर्त काही सापडत नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबरच नाराज मंडळींना देखील भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे भाजपमधीलच एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
प्रदीप गारटकर भाजपमध्ये दाखल
नगरपालिका निवडणुकीदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची साथ सोडलेले तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शनिवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. गारटकर यांची पार्श्वभूमी पाहिली तर पुर्वीपासून ते संघाच्या जवळचे मानले जातात. यामुळे इंदापूरसह बारामतीमधील भाजप कार्यकर्त्यांना लढण्यास नव्याने बळ मिळणार आहे. इतकच नाही तर त्यांच्या येण्याने भाजपमध्ये असलेल्यांना काही फरक पडत नसल्याचे दिसत असले तरी तालुक्यातील स्थान डळमळीत होण्याच्या भीतिने अनेकांची धाकधूक वाढली आहे.