PMC Election Results 2026: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ? दत्तात्रय भरणे म्हणाले
By किरण शिंदे | Updated: January 18, 2026 17:04 IST2026-01-18T16:47:23+5:302026-01-18T17:04:15+5:30
पराभव हा पराभवच असतो आणि तो मान्य करायलाच हवा. पराभवातून काही गोष्टी शिकायच्या असतात, असं स्पष्ट मत भरणे यांनी व्यक्त केलं.

PMC Election Results 2026: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ? दत्तात्रय भरणे म्हणाले
पुणे - महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षणाचे सूर उमटू लागले असून, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पराभव स्वीकारण्याची भूमिका मांडली आहे. पराभव हा पराभवच असतो आणि तो मान्य करायलाच हवा. पराभवातून काही गोष्टी शिकायच्या असतात, असं स्पष्ट मत भरणे यांनी व्यक्त केलं. आगामी जिल्हा परिषद निवडणूक च्या अनुषंगाने पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भरणे यांनी आपली भूमिका मांडली.
महापालिका निकालांबाबत बोलताना भरणे म्हणाले, “यासंदर्भात अजित पवार यांनी आधीच खुलासा केला आहे. त्यांनी खुलासा केल्यानंतर माझं बोलणं योग्य ठरणार नाही. मात्र शेवटी पराभव स्वीकारून त्यातून धडा घ्यावा लागतो. आमचे उमेदवारही यातून काहीतरी नक्कीच शिकतील. पुढील निर्णय अजित पवारच घेतील.”
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी सुरू
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारी विषयी माहिती देताना भरणे म्हणाले, “जिल्हा परिषद निवडणुकांसाठी बैठका सुरू झाल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातून प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवारांचा अहवाल अजित पवार यांनी घेतला आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,” असं त्यांनी सांगितलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? निर्णय अजित पवारांचा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर भरणे यांनी सावध भूमिका घेतली. “कार्यकर्त्यांच्या भावना असतात. मात्र याबाबत अंतिम निर्णय अजित पवारच घेतील. ते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, मात्र पुणे जिल्हा परिषद हा अजित पवारांचा गड आहे आणि तो अजित पवारांचाच राहील. असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
चिन्ह एकच असणं महत्त्वाचं – भरणे
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी दोन वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे गेली. त्यामुळे त्याचा पक्षाला फटका बसण्याची सध्या चर्चा सुरू आहे. यावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, “आघाडी कुठलीही असो, चिन्ह कुठलंही असो, पण चिन्ह एकच असायला हवं. ग्रामीण भागात दोन चिन्ह असतील तर मतदार गोंधळतात. दोन्ही पक्ष कुठल्या चिन्हावर निवडणूक लढतील, याचा निर्णय अजित पवारच घेतील. चिन्ह कुठलंही असो, पण एकच चिन्ह असलेलं चांगलं,” असं त्यांनी स्पष्ट केलं.