Pune Municipal Election Results 2026: पालिकेचा आज निकाल, दुपारीच उधळणार गुलाल; पोस्टल मतमोजणी पहिली होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 09:04 IST2026-01-16T09:00:42+5:302026-01-16T09:04:01+5:30
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, आज निकालाची उत्सुकता

Pune Municipal Election Results 2026: पालिकेचा आज निकाल, दुपारीच उधळणार गुलाल; पोस्टल मतमोजणी पहिली होणार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. १६) शहरातील १५ ठिकाणी होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. या निवडणुकीसाठी मतमोजणी सर्वाधिक २० फेऱ्या या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांमध्ये होणार असून सर्वांत कमी १२ फेऱ्या बिबवेवाडी, कसबा विश्रामबाग आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांच्या होणार आहेत. त्यामुळे पहिला निकाल साडेअकरापर्यंत येण्याची शक्यता असल्याने दुपारी दोनपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट
पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. या निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी होणार आहे. निवडणुकीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय १५ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. प्रभागनिहाय मतमोजणी फेऱ्यांचा विचार करता सर्वात कमी चार फेऱ्या १३ प्रभागांमध्ये होणार असून येथील निकाल लवकर जाहीर होईल. पाचसदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रजमध्ये १० फेऱ्या होणार आहेत, त्यामुळे या प्रभागाच्या निकालाला विलंब होऊ शकतो. क्षेत्रीय कार्यालयनिहाय दोनच प्रभागांचा समावेश असलेल्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक ३९ अप्पर-सुपर इंदिरानगर व प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक येवलेवाडी मध्ये प्रभागनिहाय सर्वाधिक प्रत्येकी १२ फेऱ्या होणार आहेत. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग क्रमांक २०,२१,२६) व कसबा विश्रामबागवाडा (प्रभाग २५,२७,२८) क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत, तसेच कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्वांत कमी १२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे येथील मतमोजणी लवकर पूर्ण होऊन या प्रभागांचा निकाल सर्वांत लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.
मतमोजणीसाठी एका फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो. तर साडेतीन-चारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल.
मतमोजणी होणार या १५ ठिकाणी :
सारसबागेशेजारील, कै. बाबूराव सणस क्रीडांगण, वडगाव बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार अकॅडमी ऑफ ए लर्निंग स्कूल, टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रांगणातील बंदिस्त पत्रा शेड, शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय मैदान, कात्रजमधील गोकुळनगर हेमी पार्कजवळील छत्रपती संभाजी महाराज ई-लर्निंग स्कूल, वानवडीतील जिजाऊ मंगल कार्यालय, हडपसरमधील माळवाडी येथील साधना विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे कर्मवीर सभागृह, खराडी येथील कै. राजाराम भिकू पठारे, बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलमधील बॅडमिटंन हॉल, कोथरूडमधील एमआयटीमधील द्रोणाचार्य बिल्डिंग पहिला मजला, भवानी पेठेतील रफी अहमद किदवाई उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय, पौडफाटा येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय इंग्रजी शाळा, कोरेगाव पार्कमधील मौलाना अब्दुल कलाम स्मारक, नगररोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय.
पोस्टल मतमोजणी पहिली होणार
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. त्यावेळी पहिल्यांदा पोस्टल मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी एक हजार ०५६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.